मोहिते-पाटील गटाशी जुळवून घेतल्याचे अजित पवार यांचे संकेत
आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटा-तटाचे राजकारण खूप झाले. परंतु यापुढे असे राजकारण पक्षाला परवडणारे नाही. आता केवळ राष्ट्रवादी हा एकच गट पक्षात राहील. झालेल्या चुकांची दुरुस्ती करून पक्षात कोणालाही दुय्यम स्थान दिले जाणार नाही, अशी ग्वाही पक्षाचे नेते अजित पवार यांनी दिली. या वेळी सोलापूरच्या विकास प्रश्नावर काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनाही नामोल्लेख टाळून टोला लगावला. याच वेळी राष्ट्रवादीअंतर्गत राजकारणात खासदार विजयसिंह मोहिते-पाटील गटाशी जुळवून घेण्याचे संकेतही त्यांनी दिले.
सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा रविवारी हुतात्मा स्मृतिमंदिरात झाला. त्या वेळी मार्गदर्शन करताना पवार हे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर पक्षाचे ज्येष्ठ नेते, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजन पाटील, पक्षाचे निरीक्षक प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, माजी आमदार युन्नूस शेख, उपमहापौर प्रवीण डोंगरे, पालिका राष्ट्रवादीचे गटनेते पद्माकर काळे आदी उपस्थित होते. पक्षाचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यापुढे पक्षसंघटनेच्या वाढीसाठी पूर्णवेळ काम करावे लागणार असून, यात गटबाजीला कोणत्याही प्रकारे थारा न देता केवळ कर्तृत्व व योगदानासह समाजात असलेली चांगली प्रतिमा याचा विचार करून कार्यकर्त्यांना बळ देण्यात येईल, असे स्पष्ट करीत अजित पवार म्हणाले, सोलापूरसह अनेक महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना राष्ट्रवादीची ताकद अधिक प्रमाणात कशी वाढेल, याचा विचार व कृती करताना प्रत्यक्षात तळागाळात जाऊन काम करावे लागणार आहे. गटबाजीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होणार नाही आणि पक्ष बदनाम होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. महापालिकेतील पक्षाच्या गटनेतेपदाचा वाद जास्त वाढू न देता तो सामंजस्याने सोडवावा, असेही त्यांनी बजावले. अलीकडेच विधान परिषदेच्या सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची मोठी ताकद असूनही महायुतीने जागा जिंकली, याचा उल्लेख करताना अजित पवार यांनी त्यावर अधिक भाष्य करण्याचे टाळले. गटबाजीला थारा देणार नाही, असे नमूद करताना त्यांनी जिल्हय़ातील मोहिते-पाटील गटाला सन्मानाची वागणूक देण्याचे संकेत दिले. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांची लोकसंख्या झपाटय़ाने वाढली असताना इकडे सोलापूरची लोकसंख्या घटली आहे. याचा अर्थ असा नाही, की सोलापूरने कुटुंब नियोजन कार्यक्रमात आघाडी घेतली आहे. केवळ उद्योगधंदे नाहीत व रोजगार उपलब्ध होत नाही, अस्तित्वात असलेले यंत्रमाग व विडी उद्योगही मोठय़ा संकटात आहेत, म्हणून येथून स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. याच सोलापूरने मुख्यमंत्रिपदाच्या माध्यमातून राज्याचे नेतृत्व केले तरी सोलापूरची ही दुरवस्था झाली आहे, अशा शब्दांत पवार यांनी काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचा नामोल्लेख टाळत त्यांना टोला लगावला. या वेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आतापर्यंत सोलापूर जिल्हय़ात पक्षात एखाद्या मुद्यावर चर्चा झाल्यानंतर निर्णय मात्र वेगळाच व्हायचा. परंतु आता पक्षात जिल्हय़ाची सूत्रे अजित पवार यांच्याकडे गेल्यामुळे त्यांचा थेट संपर्क होऊन वेळेवर अचूक निर्णय होतील, असा विश्वास व्यक्त केला. पक्षाच्या बांधणीविषयी आपण जाहीरपणे न बोलता आपले म्हणणे अजित पवार यांच्याकडे खासगी भेटीत मांडू, असेही खासदार मोहिते-पाटील यांनी नमूद केले. या वेळी प्रदीप गारटकर यांचेही भाषण झाले.