‘खोटे आरोप करण्यातच सरकारचे वर्ष सरले’

सरकारकडून गेल्या एक वर्षांपासून माझी व सुनील तटकरेंची चौकशी सुरू आहे. अद्याप त्यांना पुरावे सापडलेले नाहीत. माझ्या नावावर जर शेकडो कंपन्या असतील तर भाजपच्या त्या किरीट सोमैय्यांना द्या अशी टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.

मुळा साखर कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभ तसेच दुसऱ्या टप्प्यातील सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते आज झाले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड, अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, माजी खासदार यशवंतराव गडाख, शंकरराव गडाख, आमदार अरूण जगताप, आमदार वैभव पिचड, दादाभाऊ कळमकर, नरेंद्र घुले, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा गुंड, आशुतोष काळे, सिद्धार्थ मुरकुटे यावेळी उपस्थित होते.

पवार यांनी भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी केल्याबद्दल सरकारचा समाचार घेतला. मी व तटकरेंशिवाय दुसऱ्या बातम्याच येत नसल्याचे पवार म्हणाले. माझ्या नावावर जर ३०९ कंपन्या असतील तर त्यातील निम्म्या कंपन्या सोमैय्या यांना द्याव्यात. माझे तरी एकदाचे भले होईल. खोटे नाटे आरोप करण्यातच सरकारचे वर्ष निघून गेल्याचे पवार म्हणाले. हे सरकार शेतकऱ्यांचे नसून केवळ व्यापारी हिताचे आहे. मंत्रिमंडळात मुस्लिम समाजाला जागा मिळालेली नाही. आम्ही मात्र समतोल राखत होतो.

गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेंचा ‘बलिदान दिन’ साजरा करण्याची घोषणा िहदुत्ववादी संघटना करतात. हे सरकार केवळ िहदुत्ववादास खतपाणी घालत असून पुरोगाम्यांची हत्या होत आहेत. गुलझारसारखे साहित्यिक सरकावर ताशेरे ओढत आहेत. यापुढे आपण केवळ बघ्याची भूमिका घेणार नाही, असा इशारा पवार यांनी दिला.

कायदा सुव्यवस्था पूर्णत: ढासळली असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपुरात तर गुंडगिरी फोफावली आहे. डांसबारवरील उठलेली बंदी सरकारचे अपयश अधोरेखित करत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून आमच्या विरोधात ३०२ दाखल करण्याची भाषा करणारे आता सत्तेत असुन या आत्महत्या आता वाढल्या आहेत. आता कुणावर गुन्हे दाखल करायचे असा सवाल त्यांनी केला.

प्रारंभी मधुकर पिचड यांनी पाण्याच्या धोरणावरून सरकावर टीका केली. हुकूमशाही पद्धतीने मराठवाडय़ाला पाणी सोडण्याचा निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरत संघर्ष करणार असल्याचे ते म्हणाले.

माजी आमदार शंकरराव गडाख यांनी ७० कोटी रूपये खर्चाच्या सहवीज प्रकल्पाची माहिती दिली. कार्यक्रमास सीताराम गायकर, कॉ. अरूण कडू, देसाई देशमुख, सुजित झावरे, शिवाजी गाडे, शरद नवले आदी उपस्थित होते.