आमच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपद मिळविणारे आज आमच्या विरोधात बोलत असल्याचे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर निशाणा साधला. साताऱ्यातील शेतकरी मेळाव्यात बोलताना  पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री केल्यानंतर आघाडी सरकारचे अच्छे दिन गायब झाल्याचे पवारांनी म्हटले. त्यांच्या पायगुणामुळे सरकार पायउतार झाल्याचे सांगताना सुशीलकुमार शिंदे आणि अशोकराव चव्हाण यांचा दाखला पवारांनी दिला.  आघाडीचे सरकार असताना सुशीलकुमार शिंद आणि अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना आम्ही पुन्हा सत्तेत आलो, मात्र बाबा म्हणजे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर आघाडीचे गणित बिघडले, असे अजित पवारांनी म्हटले. काही दिवसांपूर्वी शिवसेना आणि भाजप यांच्यात दिसणारे वाद आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुरु झाल्याचे दिसत आहे. सत्तेतून बाहेर असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष पराभवाचे खापर एकमेकांवर फोडताना दिसत आहे.

यापूर्वी आघाडी सरकारच्या कार्यकाळात काँग्रेसने आमची बदनामी करण्यातच धन्यता मानली. आमचे सरकार असताना काँग्रेस पक्ष शिवसेना आणि भाजप यांच्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसलाच जास्त लक्ष्य करत होता. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी आमच्या पक्षाची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले होते. अनेक घोटाळ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना नाहक गोवण्यात आले, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ता प्रफुल पटेल यांनी केली होती. त्याच्या या टीकेनंतर सिंचन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ट काँग्रेसने नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीच लावले होते. असे चव्हाणांनी म्हटले होते. त्यांनीच राज्यातील सिंचन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाला (एसीबी) तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या चौकशीचे आदेश दिले होते, असा खुलासा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईमध्ये केला होता.