चिपळूण येथे होणाऱ्या ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाभोवतीचे वादाचे धुके आता गडद होऊ लागले आहे. संमेलनातील राजकीय नेत्यांच्या भाऊगर्दीमुळे हे साहित्य संमेलन की अ-साहित्य संमेलन असा प्रश्न निर्माण झाला असतानाच, संमेलनाच्या व्यासपीठाचे बाळासाहेबांच्या नावाने बारसे करण्यास पुरोगामी साहित्यिकांनी आक्षेप घेतला. तो वाद ताजा असतानाच, संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेवरील परशुरामाच्या चित्राने गदारोळ झाला आहे. निमंत्रणपत्रिकेत परशुरामाचे चित्र व कुऱ्हाड छापणे हा जातीय वर्चस्व प्रस्थापित करण्याचा डाव असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला असून, आयोजकांनी माफी मागून ही चित्रे काढली नाही तर संमेलन उधळून लावण्याचा इशारा संघटनेने पत्रकार परिषदेत दिला. याचबरोबर मराठा महासंघ व छावा संघटनांनीही याचा निषेध केला आहे, तर विद्रोही सांस्कृतिक चळवळीने संमेलनावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड व प्रदेश कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले की, परशुराम हे कौर्य, हिंसा, विषमता व ब्राह्मणी वर्चस्व यांचे प्रतीक आहे. तरीसुद्धा त्याचे चित्र व संमेलनस्थळी त्याचा पुतळा उभारला जातो, हे जातीय व वर्ण वर्चस्ववाद पसरवणारे दिसते. त्यामुळे त्याला विरोध केला जात आहे. संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, उद्घाटक कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाही याबाबत निवेदन देऊन संमेलनाला उपस्थित न राहण्याची विनंती करण्यात आली आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.
दुसरीकडे, २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करणारा आदर्श बहुजनांचा नाही. याचा विचार बहुजन समाजातील साहित्यिक विचारवंतांनी करावा, असे सांगतानाच, चिपळूण येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनावर बहिष्कार टाका, असे आवाहन विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य सरचिटणीस कॉ. धनाजी गुरव व माजी संमेलनाध्यक्ष राजा शिरगुप्ते यांनी सावंतवाडीत झालेल्या पत्रकारपरिषदेत केले. आम्ही हे संमेलन उधळून लावणार नाही, पण विद्रोही चळवळीतील सर्वानी संमेलनास उपस्थित राहू नये म्हणून खबरदारी घेऊ, असे ते म्हणाले.

प्रा. पुष्पा भावेंना सेनेची ‘चिपळूण बंदी’
प्रसिध्द समीक्षक पुष्पा भावे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल शिवसैनिकांची जाहीर मागितली नाही तर त्यांना चिपळूणमध्ये प्रवेशास बंदी करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांनी दिला आहे. दरम्यान, दिल्लीतील युवतीवरील अत्याचाराच्या पाश्र्वभूमीवर चिपळूण शहर पोलीस विभागातर्फे येत्या ८ जानेवारी रोजी प्रा.भावे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर तो रद्द करण्यात आला आहे.  दरम्यान या संदर्भात प्रा. पुष्पा भावे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पोलिसांची भूमिका त्यांच्या कार्यपद्धतीशी योग्य असल्याचे सांगून या विषयावर कोणतेही अधिक भाष्य करण्यास असमर्थता दर्शविली.