अकोला जीआरपीच्या सहायक पोलीस निरीक्षकासह ५ पोलीस कर्मचाऱ्यांना शुक्रवारी रात्री फेरीवाल्यांकडून ६ हजार ५०० रुपयांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली, तर बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २ हजारांची लाच घेतांना पशुसंवर्धन उपायुक्ताला गजाआड केले.
अकोला रेल्वे स्थानक परिसरात, तसेच रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या फेरीवाल्याला कारवाई टाळण्यासाठी अकोला जीआरपीचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार तुकाराम वानखडे, जीआरपी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी गौतम हरिभाऊ शिरसाट, शरद बाळाभाऊ जुनघरे, सतीश जसवंतसिंह चव्हाण आणि सुनील लक्ष्मण कडू यांनी फेरीवाल्यास ६ हजार ५०० रुपयांची लाच मागितली. फेरीवाल्याने याची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपअधीक्षक उत्तम जाधव यांनी शुक्रवारी रात्री रेल्वेस्थानक परिसरात सापळा रचून आरोपींना अटक केली.
ही कारवाई त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश मोहोड, इॅश्वर चव्हाण, पंचबुध्दे, चंद्रकांत काळे, सुनील राऊ त, संतोष दहीहांडे, संतोष उंबरकर, सुनील धामोळे, निशीदिनी गावंडे आणि सुनील पवार यांनी केली.
दुसऱ्या प्रकरणात, बुलढाणा जिल्ह्य़ातील चिखली तालुक्यातील केळवद येथील तक्रारदाराच्या भावाच्या नावाने पशुसंवर्धन विभागाकडून बकरी पालन योजनेंतर्गत ४५ हजाराचे अनुदान प्राप्त झाले.
मात्र, या रकमेचा धनादेश देण्यासाठी आरोपी पशुसंवर्धन उपायुक्त भिकनसिंह डोंगरसिंह राजपूत यांनी २ हजाराची लाच मागितली. या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रात्री पशुचिकित्सालय कार्यालय परिसरात सापळा रचून राजपूत यांना २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी आरोपी राजपूत यांना अटक करून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा व खामगाव शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने छापा टाकून वरखेड शिवारात सुमारे ५ लाख रुपयांचा गांजा पकडला. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली. वरखेड फाटय़ाजवळील झोपडय़ात करण अर्जुन चव्हाण (२०), प्रकाश हिरालाल चव्हाण (३०), अशोक राजू चव्हाण (२६) हे तिघे जण गांजा विक्रीसाठी जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा विभागाला मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.डी. ढाकणे, स्थानिक गुन्हे शाखा विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सय्यद, तहसीलदार कृणाल झाल्टे, मंडळ अधिकारी आर.डी. कुळकर्णी व पोलीस कर्मचारी यांनी छापा टाकला तेव्हा अंदाजे ५ लाख रुपये किमतीचा गांजा तिघांजवळ आढळला. त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रतापसिंग शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.