मुंबईतील व्यावसायिकाची बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी भाजप आमदार रणधीर सावरकर, खासदारांचे चिरंजीव अनुप संजय धोत्रे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणामुळे सावरकर गोत्यात आले असून यासंदर्भात न्यायालयात बाजू मांडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. सावरकर हे अकोला पूर्वचे आमदार आहेत.

मुंबईतील रहिवासी सचिन काळे हे बांधकाम कंत्राटदार आहेत. त्यांनी मुंबईतील विक्रोळी पूर्व येथील बिल्डींग क्र.८७ च्या पुनर्विकासासाठी धनलक्ष्मी एन्टरप्रायजेसचे भागीदार सुरेश मोरे यांच्यासोबत ५ ऑक्टोबर २०११ रोजी करार केला होता. पहिल्या दोन मजल्याचे काम केल्यावर धनलक्ष्मी एन्टरप्रायजेसकडे सचिन काळे यांनी देयक सादर केले. ६ मार्च २०१२ ला बळवंत महल्ले व रणधीर सावरकर यांनी धनलक्ष्मी एन्टरप्रायजेसच्या नावाचा ४५ लाख ६२ हजार ६०० रुपयांचा धनादेश काळे यांना दिला. त्यानंतर काळे यांनी धनलक्ष्मी एन्टरप्रायजेसकडे टप्याटप्याने देयक सादर केल्यावर त्यापोटी अर्धवट रकमेचा धनादेश देण्यात आला. प्रकल्पाचे ८६.३० टक्के बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बांधकामाची थकीत रक्कम म्हणजेच ६ कोटी ५० लाख रुपयांची मागणी काळे यांनी केली. त्यावर बळवंत महल्ले आणि रणधीर सावरकर यांनी शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप काळे यांनी तक्रारीत केला आहे.

धनलक्ष्मी एन्टरप्रायजेसचे नोंदणीकृत भागीदार नसतांना आर्थिक व्यवहार करून फसवणूक केली व मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी काळे यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बळवंत माणिकराव महल्ले, रणधीर प्रल्हादराव सावरकर, प्रकाश गोपाळराव पोहरे, ऋषिकेश प्रकाश पोहरे, अनुप संजय धोत्रे यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधानातील कलम ४२०, १२०(ब), ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विक्रोळी पोलीस तापस करीत आहेत.

दरम्यान, आमदार सावरकर यांनी या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई येथे गुन्हा दाखल झाल्याची माहिती समजली आहे. यासंदर्भात आम्ही न्यायालयात बाजू मांडू असे सावरकर यांनी सांगितले.