आळंदीतील माजी नगराध्यक्ष नानासाहेब गरुड आणि त्यांचा मुलगा प्रदीप गरुड यांना पैसे वाटताना पकडण्यात आले आहे. गरुड यांच्याकडून एक ग्रॅम सोन्याच्या ४१ अंगठ्या आणि २ लाख ६० हजार रुपये जप्त करण्यात आले आहे.

आळंदी नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ अ मधील अपक्ष उमेदवार प्रदीप गरुड आणि त्यांचे वडील नानासाहेब गरुड हे दोघे घुंडरे आळी येथे मतदारांना पैसे आणि सोन्याच्या अंगठ्या वाटप करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. या दोघांकडून ४१ अंगठ्या जप्त करण्यात आल्या. तसेच २ लाख ६० हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या नोटांमध्ये ५०० रुपयाच्या २०० जुन्या नोटांचा समावेश आहे. पोलिसांनी भारतीय दंड विधानातील १७१ एच आणि ई अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून त्यांना आता सोडण्यात आले आहे.

चौकशीदरम्यान सोन्याच्या अंगठ्यांविषयी नानासाहेब गरुड यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांच्याकडून मिळालेला मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाची माहिती आळंदी नगरपरिषदेतील निवडणूक निर्णय अधिका-यांना देण्यात आली आहे. गरुड पितापुत्रांना यापुढे चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहावे लागेल अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.