नाशिक महानगरपालिकेची निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे यासाठी पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, पोलीस उप-आयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात गस्त ठेवण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांना सफेद रंगाच्या तवेरा गाडीतून चोरट्या पद्धतीने विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने चोपडा लॉंस या ठिकाणी नाकाबंदी केली. सोमवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास संशियत वाहन दिसले. पोलिसांनी ही गाडी थांबवून झडती घेतली. गाडीतील महेश भारती (३१), भिला पवार (५१) शिवराम भावसार (५५), (तिघेही राहणार पंचवटी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

गाडीतून ६२ हजार १९६ रुपये किमतीचा विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय गाडीही ताब्यात घेण्यात आली. याप्रमाणे एकूण ८ लाख ६२ हजार १९६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सरकारवाडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या एका घटनेत एमजीरोड परिसरात हत्यारासह फिरून मतदारामध्ये दहशत निर्माण करणारा आरोपी गणेश बाळासाहेब चांगले यास पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. एमजी रोडवर एका सफेद रंगाच्या मारुती स्विफ्ट कारमधून गणेश चांगले फिरताना पोलिसांना दिसला. पोलिसांची चाहूल लागताच गाडी तेथेच सोडून तो यशवंत व्यायाम शाळेजवळील अंधार व गर्दीचा फायदा घेवून पळून गेला. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता गाडीत हत्यार सापडले. पोलिसांनी ही गाडी जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.