अवैध धंद्यांना पायबंद घाला, अशी मागणी पोलिसांकडे करणाऱ्या उस्मानाबाद तालुक्यातील कनगरावासीयांना पोलिसांनीच अक्षरश: झोडपून काढले. पोलिसांच्या मारातून महिलाही सुटल्या नाहीत. कोणाचे गुडघे फुटले आहे, तर काही जणांची हाडे मोडली आहेत. पोलिसांनी केलेल्या हाणामारीचे व्रण गावकऱ्यांच्या अंगावर दिसत होते. अनेकांच्या घरात पोलिसांच्या काठय़ांचे तुकडे पडले होते. पोलिसांनी घरांचे दरवाजे तोडून मध्यरात्री झोपलेल्या ग्रामस्थांना बेदम चोप दिला. पोलिसांनी ५४ जणांना अटक केली.  
उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा गावातील महिलांनी शनिवारी बेंबळी पोलीस ठाण्यात चोरीच्या मार्गाने होत असलेल्या दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी, असे निवेदन दिले होते. पोलिसांनी तुम्हीच दारू पकडून दाखवा, त्यानंतर कारवाई करू, असे सुनावून त्या महिलांना पिटाळून लावले. सोमवारी सायंकाळी गावातील महिलांनी पुढाकार घेत दारू पकडली आणि पोलिसांना येऊन कारवाई करण्याची विनंती केली. पोलीस पाटील वाजीद शेख यांनी दारू पकडल्याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलीस गावात आले आणि महिला व ग्रामस्थांनाच दमबाजी केली. संतप्त महिला पोलिसांच्या अंगावर धाऊन गेल्या. त्या वेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यापकी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून तिला बाजूला ढकलून दिल्याची माहिती सरपंच राजेंद्र इंगळे यांनी दिली. अवैध दारू विक्री करणाऱ्यांना पोलीस पाठिशी घालीत असल्याचे पाहून ग्रामस्थांचा राग अनावर झाला. त्यांनी पोलिसांना चांगलाच चोप दिला. याबाबतची माहिती मिळताच रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दस्तुरखुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक लवाजमा घेऊन कनगरा गावात धडकले. रात्री ११ ते पहाटे तीन वाजेपर्यंत गावकऱ्यांना बदडून काढले. पोलिसांनी घरांचे दरवाजे तोडले, ट्रॅक्टरच्या हेडलाइट्स फोडल्या. गावातल्या प्रत्येक घरात घुसून दिसेल त्या पुरुषाला बेदम मारहाण केली. तसेच ग्रामस्थांना अटक करून ग्रामस्थांवर पोलिसांच्या खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. अवैध धंद्याची तक्रार करणाऱ्या बचतगटाच्या आठ महिलांनाही कोठडीत डांबले आहे.   

‘अधिकाऱ्यांना बडतर्फ करा’
उस्मानाबाद जिल्ह्य़ातील कनगरा गावातील रहिवाशांना अमानुष मारहाण करणारे पोलीस अधीक्षक सचिन पाटील आणि उपअधीक्षक वैशाली कडूकर यांना तातडीने बडतर्फ करून घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली आहे. पोलिसांनी कायद्याचे रक्षक बनून सर्वसामान्यांचे रक्षण करायचे आहे. मात्र त्यांनी भक्षक बनून केलेला हा प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा असल्याचे तावडे म्हणाले.