अलिबाग तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी झालेल्या निवडणूकीत शेतकरी कामगार पक्षाला वर्चस्व राखण्यात यश आले आहे. मात्र यापुढील काळात हे वर्चस्व कायम राहिल की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत विरोधीपक्षांच्या उमेदवारांना शेकाप उमेदवारांपेक्षा एकुण १ हजार ६४१ मते पडली आहेत. शेकापसाठी ही धोक्याची घंटा आहे.

अलिबाग तालुका हा शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. निवडक अपवाद वगळता शेकापने गेली पाच दशके तालुक्यावर वर्चस्व राखले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीपासून पक्षाच्या लोकप्रियतेला ग्रहण लागण्यास सुरूवात झाल्याचे चित्र पहायला मिळते आहे. तालुक्यात शिवसेनेचा वाढता प्रभाव याला कारणीभुत ठरला आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अनंत गीते यांना अलिबागकरांनी भरघोस मते दिली होती. त्यानंतर अलिबाग विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांना ६० हजार मतांचा टप्पा ओलांडला होता. तर नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन जिल्हा परिषद सदस्य आणि चार पंचायत समिती सदस्य विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे शेकापचे मताधिक्य घटल्याचे दिसून येत आहे. अर्थात शिवसेनेच्या या वाटचालीत काँग्रेसची साथ महत्वाची ठरली आहे.

अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७ जागांपकी ५ जागा शेकापने जिंकल्या. पंचायत समितीच्या १५ पकी ८ जागा शेकापने जिंकल्या असल्या तरी पंचायत समितीमध्ये विरोधकांची मते वाढली आहेत. पंचायत समिती निवडणुकीत शेकापच्या १४ उमेदवारांना एकूण ६४ हजार ७५ मते मिळाली. त्यांच्या विरोधातील सेना- कॉंग्रेस आघाडीच्या १४ उमेदवारांना ६५ हजार ७१६ मते मिळाली. शेकापच्या विरोधी आघाडीला १ हजार ६४१ मते जास्त मिळाली आहेत. भाजपने स्वतंत्रपणे उभे केलेल्या उमेदवारांना १ हजार ७८६  मते मिळाली आहेत. पंचायत समिती निवडणुकीत शेकापपेक्षा विरोधी पक्षांना ३ हजार ४२७ मते अधिक मिळाली आहेत. एक प्रकारे मतदारांनी शेकापला धोक्याचा इशारा दिला आहे.

आलिबाग पंचायत समितीवर १९६२ पासून शेकापची सत्ता आहे. ती त्यांनी कायम राखली आहे. तालुक्यात शेकाप- राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडी विरूद्ध कॉग्रेस-शिवसेना युती अशी लढत झाली. काँग्रेस, शिवसेना आणि भाजपने एकत्र युतीने लढण्याचा प्रयत्न

केला. मात्र काही ठिकाणी ही युती यशस्वी झाली नाही. भाजपाच्या उमेदवारीमुळे काही ठिकाणी काँग्रेस-शिवसेना आघाडीचे उमेदवार पराभूत झाले. अन्यथा अलिबाग पंचायत समितीत यावेळी चित्र वेगळे असते.

अलिबाग तालुक्यात सात जिल्हा परिषद गटांच्या जागांपकी भाजपाने शहापूर या एका जागेवर तर पंचायत समितीच्या सारळ, शहापूर, थळ, रेवदंडा या चार ठिकाणी उमेदवार दिले होते. शहापूर जिल्हा परिषदेच्या गटासाठी भाजपाने रोशनी ठाकूर यांना उमेदवारी दिली होती. या जिल्हा परिषद गटात शेकाप-राष्ट्रवादी आघाडी विरूध्द कॉग्रेस-शिवसेना युती विरूध्द भाजप अशी तिरंगी लढत होती. शेकापचे आमदार पंडित पाटील यांच्या पत्नी सुश्रुता पाटील तर कॉग्रेसतर्फे उज्वला पाटील निवडणूक लढवित होत्या. या निवडणुकीत शेकापच्या सुश्रुता पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवारावर केवळ २ हजार २६चे मताधिक्य घेत विजय मिळविला. तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या भाजपच्या रोशनी ठाकूर यांना १८२० मते मिळाली. ‘नोटा‘साठी ४५५ मते आहेत. शहापूर पंचायत समिती गणात शिवसेना-काँग्रेस युतीचे संदीप पाटील फक्त १ हजार १०१ मतांनी पराभूत झाले. तर तिसऱ्या स्थानावर राहिलेले भाजपाचे परशुराम म्हात्रे यांनी १ हजार २३० मते घेतली. येथील मतविभागणीचा फायदा शेकाप उमेदवाराला झाला.

सारळ पंचायत समिती गणात शेकाप-राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध शिवसेना-कॉग्रेस युती विरूद्ध भाजप अशी तिरंगी लढत झाली. येथे कॉग्रेसच्या उमेदवार अमृता नाईक यांचा फक्त ३९ मतांनी पराभव झाला आहे. या तिरंगी लढतीत भाजपाचे उमेदवार चंद्रकांत पाटील ५५६ मते घेऊन तिसऱ्या स्थानावर राहिले. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेस-शिवसेना युतीच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

बालेकिल्ल्यात विरोधकांचा वाढता प्रभाव शेकापसाठी चिंतेची बाब आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत आपले गड कायम राखण्यात शेकापला यश आले असले तरी विधान सभा निवडणूकीत पक्षासाठी ही धोक्याची सुचना आहे. मुरुडमध्ये आधी नगरपालिका आणि नंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत शिवसेनेने मिळवलेले यश शेकापसाठी घातक आहे. त्यामुळे या निकालाचे शेकापने आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे.

शिवसेनेला रोखण्यासाठी व्यापक रणनिती आखणे गरजेचे आहे. नाहीतर बालेकिल्ल्यात पक्षाचे अस्तित्व धोक्यात येण्यास वेळ लागणार नाही.