रायगड जिल्हा ज्युनियर (१९ वर्षांखालील ) मुलांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पध्रेत अलिबागने अंतिम विजेतेपद पटकावले. खोपोली संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. खोपोलीच्या ऋषिकेश कर्णूक याला स्पध्रेचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले. अलिबागचा ऋषिकेश राऊत याला उत्कृष्ट फलंदाजीचे म्हणून तर अलिबागचा अभिषेक गदमले याला उत्कृष्ट गोलंदाजीचे पारितोषिक देण्यात आले.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने उरण स्पोर्टस क्रिकेट असोसिएशनच्या जयमानपदाखाली जे.एन.पी.टी. मदान उरण येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अंतिम सामन्यात अलिबागने खोपोलीचा ७ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना खोपोलीने ४० षटकांमध्ये ९ गडी गमावून १५४ धावा केल्या. अलिबागच्या अभिषेक गदमलेने २६ धावांत ३ बळी घेतले. अनिकेत गदमले याने तर अनुज राऊत याने २ गडी बाद केले. खोपोलीच्या हर्षद हलपतराव याने एका बाजूने जिद्दीने फलंदाजी करून शतक झळकावले. त्याने १२७ चेंडूंचा सामना करून १०६ धावा काढल्या.
विजयासाठी आवश्यक असलेल्या धावांचा पाठलाग करताना अलिबागची अवस्था २ बाद ११ अशी होती. परंतु ऋषिकेश राऊत (नाबाद ७७ ) व ऋषिकेश िपगळसकर (४१), विशाल दुग्रे (२१) यांनी केलेल्या दमदार फलंदाजीमुळे अलिबागने ३३ षटकांमध्ये ३ गडय़ांच्या मोबदल्यात १५५ धावा करत सामना जिंकून विजेतेपदाला गवसणी घातली. आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते स्पध्रेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. नरेश रहाळकर, अतुल भगत, प्रशांत पाटील, पंडितशेठ घरत, कमलाकर घरत, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीप नाईक, उपाध्यक्ष प्रकाश पावसकर, कार्योपाध्यक्ष जयंत नाईक, सचिव विवेक बहुतुले, निवड समिती सदस्य विजय पाटील, राजेंद्र कोंडाळकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. पंकज पंडित, सुयोग चौधरी यांनी पंच म्हणून तर संदीप जोशी यांनी स्कोअरर म्हणून काम पाहिले.
स्पध्रेचे आयोजन केल्याबद्दल उरण क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशनचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. उरण क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष किरीट पाटील यांच्यासह सुजीत घरत, नयन कट्टा, विराज लवेकर, प्रशांत माने, मनोज भगत, केसरीनाथ म्हात्रे, संदीप पाटील यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.