अवघा रंग एक झाला

पतियाळा, जयपूर-अत्रौली आणि किराणा अशा शास्त्रीय संगीताच्या प्रांतातील विविध घराण्याच्या गायकीसह लखनौ घराण्याच्या पं.

प्रतिनिधी , पुणे | December 16, 2012 2:38 AM

पतियाळा, जयपूर-अत्रौली आणि किराणा अशा शास्त्रीय संगीताच्या प्रांतातील विविध घराण्याच्या गायकीसह लखनौ घराण्याच्या पं. स्वपन चौधरी यांच्या एकल तबलावादन आणि उस्ताद अमजद अली खाँ यांच्या बहारदार सरोदवादनाने रसिकांना शनिवारी स्वरांच्या दुनियेची अनोखी सफर घडली. वेगवेगळ्या घराण्याच्या कलाविष्काराने विविध अनुभवांचे संचित देणाऱ्या या मैफलींच्या श्रवणातून ‘अवघा रंग एक झाला’ अशीच रसिकांची भावावस्था झाली.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाचा ‘लोकसत्ता’ माध्यम प्रायोजक आहे. या महोत्सवाच्या हीरकमहोत्सवी वर्षांनिमित्त यंदा रसिकांना सहा दिवसांच्या अभिजात संगीताची मेजवानी लाभली आहे.
शनिवारच्या सत्रातील वेगवेगळ्या घराण्यांच्या कलाविष्कारातून रसिकांना आनंदाची पर्वणी लाभली. पाच कलाकारांचे सादरीकरण असल्यामुळे आजचे सत्र दुपारी तीन वाजताच सुरू झाले. उन्हाची तमा न बाळगता संगीतप्रेमाच्या ओढीने रसिकांची पावले रमणबाग प्रशालेकडे वळू लागली आणि मैदानातील गर्दीने कलाकारांचा उत्साह द्विगुणित केला.
पतियाळा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. जगदीश प्रसाद यांचे पुत्र आणि शिष्य सम्राट पंडित यांच्या गायनाने शनिवारच्या सत्राची सुरुवात झाली. त्यांनी पदार्पणातील गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करीत आपले सम्राट हे नाव सार्थ ठरविले. ‘यमन’ रागातील दोन बंदिशी त्यांनी सादर केल्या. त्यानंतर रसिकांच्या आग्रहास्तव ‘याद पियाकी आये
या लोकप्रिय ठुमरी गायनाने त्यांची मैफल संपली. या महोत्सवातच पं. जगदीश प्रसाद यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती. त्यामुळे सम्राट यांच्या ठुमरी गायनातील आर्त स्वरांतून त्यांच्या पिताजींची याद जागी झाली आणि ‘‘याद ‘पिता’की आये’’ असेच हे बोल असल्याचा भास श्रोत्यांना झाला.
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या शिष्या आणि लोकप्रिय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांचे टाळ्यांच्या कडकडाटातच स्वागत झाले. त्यांनी आपल्या प्रतिभेने ‘भीमपलास’ रागातील दोन बंदिशी खुलविल्या आणि त्याला जोडूनच तराणा सादर केला. स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांनी निर्मिती केलेल्या ‘कलाश्री’ रागातील बंदिश सादर करीत त्यांनी पंडितजींना अभिवादन केले.
‘कलावती’ रागातील तराण्यानंतर ‘बोलावा विठ्ठल’ हा संत तुकाराम महाराजांचा अभंग त्यांनी भक्तिरसात गात मैफलीची सांगता केली.
लखनौ घराण्याचे ज्येष्ठ तबलावादक पं. स्वपन चौधरी यांच्या वादनातून ‘तबल्याचीही एक भाषा असते’, या त्यांच्या मुलाखतीतील विधानाची प्रचिती रसिकांना आली. त्यांनी यापूर्वी महोत्सवामध्ये आपल्या कलेचा आविष्कार सादर केला आहे. मात्र, यंदाच्या हीरकमहोत्सवी वर्षांनिमित्त त्यांच्या एकल तबलावादनाच्या मैफलीची मेजवानी रसिकांना लाभली. त्यांना तन्मय देवचक्के यांनी लहरासाथ केली. तबल्याच्या बोलातून तीनताल सादर केल्यानंतर त्यांनी लखनौ घराण्याच्या पारंपरिक बंदिशीचे बोल तबल्यावर उमटवताच रसिक तालाच्या दुनियेत हरवून गेले.
स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र आणि किराणा घराण्याचे गायक श्रीनिवास जोशी यांनी ‘मियाँ मल्हार’ राग सादर केला. उस्ताद अमजद अली खाँ यांच्या सरोदवादनाने संगीतप्रेमी रसिकांच्या श्रुती धन्य झाल्या. त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वादनाने शनिवारच्या सत्राची सांगता झाली.

First Published on December 16, 2012 2:38 am

Web Title: all colors became as one