महायुती आणि कॉंग्रेस आघाडी टिकणार की नाही? याबाबत संध्याकाळी उशिरापर्यंत काहीच निर्णय न झाल्यामुळे कोकणातील सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असले, तरी येथे मुख्य लढत शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांमध्ये होईल, असे चित्र आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार उद्यापासून अर्ज दाखल करणार आहेत. पण त्यामध्ये मित्रपक्षांचे कार्यकर्ते सहभागी होणार किंवा नाही, याचे ठोस उत्तर बुधवारी मिळू शकले नाही. या दोन जिल्ह्य़ांमध्ये मिळून असलेल्या आठ जागांपैकी दापोली, राजापूर आणि सावंतवाडी या शिवसेनेच्या तीन जागांवरील उमेदवार विजयी होण्याची दाट शक्यता असून, चिपळूण मतदारसंघात मात्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निकम यांनी सेनेचे आमदार सदानंद चव्हाण यांच्यापुढे चांगले आव्हान उभे केले आहे. तसेच कुडाळमधून सेनेचे जिल्हाप्रमुख नाईक यांनी राणेंचा पराभव केल्यास ते ‘जायंट किलर’ ठरू शकतात. मात्र भाजपचे उमेदवार असलेल्या तीन जागांपैकी कणकवलीत युती न झाल्यास विद्यमान आमदार जठार यांना स्वबळावर नितेश राणेंचा पराभव करण्याची करामत करून दाखवावी लागणार आहे, तर रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी भाजपचे माजी आमदार माने यांच्या पराभवाची हॅटट्रिक करण्याच्या इराद्याने रिंगणात उतरले आहेत. अशा परिस्थितीत माने यांना विजयासाठी शिवसेनेची साथ अतिशय गरजेची आहे. तसे न झाल्यास सामंतांचा मार्ग सुकर होणार आहे. गुहागरमध्ये कामगारमंत्री जाधव यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात भरपूर निधी आणून चांगली बांधणी केली आहे. त्यामुळे भाजपचे माजी आमदार डॉ. नातू यांची वाटचाल आधीच खडतर आहे. त्यात युती तुटल्यास जाधव यांचा विजय सोपा होणार आहे.
कॉंग्रेस आघाडीच्या गोटातही दापोली आणि राजापूर मतदारसंघाच्या उमेदवारांची नावे अजून निश्चित झाली नसल्यामुळे गोंधळाची परिस्थिती आहे. त्यामुळे उद्योगमंत्री नारायण राणे वगळता या पक्षाला कोकणातून फारसे यश मिळण्याची शक्यता नाही. लोकसभा निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत जनमताचा रोष कायम राहिल्यास खुद्द राणेही अडचणीत येऊ शकतात, असे चित्र आहे.
या पाश्र्वभूमीवर युती किंवा आघाडी झाली अथवा न झाली तरी कोकणात मुख्य लढत शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच होईल, अशी अपेक्षा आहे.