राजकारण व समाजकारण करताना ‘फटकारे’ योग्य ठिकाणी वापरण्याचे शिक्षण बाळासाहेबांकडून शिवसैनिकांना मिळाले. मराठी, हिंदुत्व आणि समाजसेवा यासाठी झटणाऱ्या नेत्याच्या कामाचा वसा पुढे जपणे, हीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांनी व्यक्त केली.
शिवसेनेच्या वतीने रविवारी येथील महाकवी कालिदास कलामंदिरात बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानावरून जोशी बोलत होते. बाळासाहेबांना समजून घेण्यासाठी शिवसेनेला समजून घ्यावे लागेल आणि शिवसेनेला समजून घेण्यासाठी बाळासाहेबांना, इतके हे दोघे समरस झाले होते, असे नमूद करत जोशी यांनी बाळासाहेबांच्या स्वभावाचे विविध पैलू मांडले. परिणामांची पर्वा न करता ठामपणे विचार मांडणारा हा नेता होता. पोटात एक आणि ओठात दुसरे अशी वृत्ती असणारे अनेक जण सापडतील. त्यामुळेच जे मनात असेल ते बोलणे हा गुण त्यांचे वेगळेपण दर्शवितो. बाळासाहेबांनी कधीच जातीभेद केला नाही. करतो, पाहतो असे वागणे कधीही न जमलेल्या बाळासाहेबांनी पद देताना ते कट्टर शिवसैनिकालाच मिळतील हे पाहिले. त्यामुळेच आपणास विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री, लोकसभेचा सभापती अशी पदे मिळत गेली, हे जोशी यांनी नमूद केले. ‘एक देश एक कायदा’ हे त्यांचे स्वप्न पूर्ण होण्याची गरजही जोशी यांनी मांडली. शिवसेनेचे उपनेते आ. बबन घोलप यांनी बाळासाहेबांचा परिसस्पर्श लाभल्याने अनेक कार्यकर्ते मंत्रिपदापर्यंत पोहोचल्याचे नमूद केले. ते व्यक्ती नव्हते तर एक शक्ती होते, अशी भावनाही घोलप यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीचे आ. जयंत जाधव यांनी ‘झाले बहू होतील बहू, या सम हा’ या शब्दांत, तर मनसेचे आ. उत्तम ढिकले यांनी या युगातील महान योद्धा असे बाळासाहेबांचे वर्णन केले. महापौर अॅड. यतिन वाघ यांनी बाळासाहेबांसाठी नाशिकमध्ये काय करता येईल हे सुचविण्याचे आवाहन नागरिकांना केले. जातीयवाद व प्रांतवादाला विरोध करणारे राजकारण करत बाळासाहेबांनी नवीन पिढीपुढे आदर्श वस्तुपाठ ठेवल्याचे भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी नमूद केले. एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व असे वर्णन पालिकेतील अपक्ष गटाचे नेते गुरुमित बग्गा यांनी केले. ‘गांवकरी’चे संपादक वंदन पोतनीस यांनी फटकारे मारणारे व वाघासारखे व्यक्तिमत्त्व बाळासाहेबांचे होते, असे नमूद केले. याशिवाय आ. जयप्रकाश छाजेड, माजी खासदार माधवराव पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजय कदम, शेतकरी कामगार पक्षाचे अॅड. मनीष बस्ते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रकाश लोंढे, मजूर फेडरेशनचे योगेश हिरे, वारकरी संप्रदायाचे पुंडलिक थेटे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. गिरीश देशपांडे, डॉ. शैलेंद्र गायकवाड, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, काँग्रेसचे शरद आहेर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रास्ताविक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी केले. प्रारंभी माजी उपमहापौर अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेला बाळासाहेबांविषयीचा लघुपट दाखविण्यात आला. या वेळी संपूर्ण सभागृह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या गर्दीने तुडुंब भरले होते.