राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या दबावानंतर बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या बदलीची गुगली मुख्यमंत्र्यांनी टाकली आणि लगेच राष्ट्रवादीविरोधात जनक्षोभ उसळला. भाजप, शिवसेना या विरोधी पक्षांना राष्ट्रवादीवर तुटून पडण्याची आयती संधी मिळाली. मुंबईपासून गल्लीपर्यंत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठली. दोन्ही काँग्रेसअंतर्गत स्पर्धेतून नेत्यांनी एकमेकांना, तर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लक्ष्य करीत राजकीय हिशेब चुकता करण्याचा प्रयत्न चालवल्याचे दिसते. यात राष्ट्रवादीच्या नेत्यांची अवस्था मात्र दयनीय झाल्याचे चित्र आहे.
बीडचे जिल्हाधिकारी केंद्रेकर यांची अवघ्या आठ महिन्यांत बदली करण्याचा घाट सरकारने घातला. सत्ताधारी पक्षाचे नेते बदली प्रशासकीय भाग असल्याचे सांगत असले, तरी प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री व आमदारांच्या दबावामुळेच मुख्यमंत्र्यांनी केंद्रेकर यांची बदली करण्याचा प्रयत्न केल्याचे आता लपून राहिलेले नाही. प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी राजकीय वजन वापरून बदली केल्याच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वसामान्य लोक रस्त्यावर उतरले. याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी तात्काळ बदली रद्द करून त्यांना बीडला रुजू होण्याचे आदेश देणे अपेक्षित होते.
मात्र, तीन दिवस उलटून गेले तरी मुख्यमंत्री केवळ बदली झाली नाही, असे सांगत राजकीय डाव टाकत असल्याचे मानले जात आहे. बीड जिल्हय़ात राष्ट्रवादीचे दोन मंत्री, विधानसभेचे ५ व विधान परिषदेचे ३ आमदार असे एकतर्फी वर्चस्व आहे. मंत्री-आमदारांच्या तक्रारी व राजकीय दबावानंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी थेट बदलीचे आदेश न देता केंद्रेकर यांना केवळ रुजू होण्यापासून थांबवण्याची खेळी केली. या डावात सर्वसामान्यांमधून राष्ट्रवादी नेत्यांच्या विरोधात जनक्षोभ निर्माण झाला. भ्रष्टाचार निपटून काढणारा व प्रामाणिक अधिकाऱ्यांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांना वावडे झाल्याचे उघड बोलत लोक राष्ट्रवादीच्या नेत्यांविरुद्ध जाहीर संताप व्यक्त करीत आहेत. परिणामी, राष्ट्रवादीविरोधात बदलीच्या गुगलीने वातावरण तयार करण्यात मुख्यमंत्री यशस्वी झाल्याचे मानले जाते.
काँग्रेस-राष्ट्रवादीअंतर्गत सुरू असलेल्या अंतर्गत शीतयुद्धातूनच केंद्रेकरांच्या बदलीचा विषय झाल्याचे दिसत असून, तात्काळ कोणताही निर्णय न घेता मुख्यमंत्र्यांनी एका डावात राष्ट्रवादीला उघडे करत राष्ट्रवादीविरोधात विरोधकांना चांगले कोलीत दिल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी बदली रद्द केल्यास राष्ट्रवादीच्या नेत्यांची अवस्था सांगता येत नाही सहनही होत नाही, अशी होणार आहे!
बदली झालीच तर जनमत राष्ट्रवादीच्या पूर्ण विरोधात जाईल, अशी स्थिती निर्माण झाल्याने राष्ट्रवादीचे नेते हतबल झाले आहेत. दुसऱ्या बाजूला भाजप, शिवसेना या विरोधी पक्षांना राष्ट्रवादीवर तुटून पडण्याची संधी मिळाली. खासदार गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादी नेत्यांच्या भ्रष्ट कारभाराला केंद्रेकर यांनी आळा घातल्यामुळे त्यांची बदली करण्यात आल्याचा थेट आरोप करीत मुख्यमंत्र्यांनी दबावाला बळी न पडता बदली करू नये, अशी मागणी केली. काँग्रेसचे आमदार सुरेश नवले यांनीही थेट पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर हेच या बदलीमागचे सूत्रधार असल्याचा आरोप करून डाव साधला. भाजपचे रमेश पोकळे, राजेंद्र बांगर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, मनसेचे अशोक तावरे यांनी राष्ट्रवादीचे मंत्री जयदत्त क्षीरसागर, प्रकाश सोळंके, तसेच आमदार सुरेश धस, अमरसिंह पंडित व धनंजय मुंडे यांनीच दबाव आणून प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली केल्याचा आरोप केला. दोन दिवस राष्ट्रवादीविरोधात मुंबईपासून गल्लीपर्यंत प्रसारमाध्यमातून टीकेची झोड उठली गेली आहे.
राष्ट्रवादीचे कोणीच स्पष्टीकरण देत नव्हते. अखेर अमरसिंह पंडित यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावत बदलीसाठी मुख्यमंत्र्यांना आपण भेटलो नसल्याचे सांगितले. जयदत्त क्षीरसागर यांनीही माध्यमांसमोर येत आपल्या कोणत्याही आर्थिक व्यवहाराचा जिल्हाधिकारी यांच्याशी वाद नव्हता. त्यांच्या बदलीशी आपला काहीही संबंध नाही, ती प्रशासकीय बाब आहे. त्यामुळे आपल्यावरील आरोप राजकीय द्वेषातून असल्याचे सांगितले. या पाश्र्वभूमीवर सत्ताधारी-विरोधी नेत्यांमध्ये केंद्रेकर बदलीवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.