कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढ मागणीच्या समर्थनार्थ गुरुवारी पुकारण्यात आलेल्या ‘बंद’ला काहीसे हिंसक वळण लागल्याचे चित्र आहे. बंदच्या समर्थकांनी शहरातील रिक्षांची तोडफोड केली. कोल्हापुरातील सर्वपक्षीयांनी पुकारलेल्या या बंदला संपूर्ण पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसते आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
गेल्या ४० वर्षांपासून कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ झालेली नाही. त्यामुळे महापालिकेच्या नजीक असलेली १८ गावे पालिका हद्दीत आणण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. पण त्याला या १८ गावांचा विरोध आहे. हद्दवाढीच्या विरोधात बुधवारी या १८ गावांमध्ये बंद पुकारण्यात आला होता. त्यानंतर गुरुवारी हद्दवाढीच्या मागणीसाठी कोल्हापूर शहरात बंद पुकारण्यात आला आहे. कोल्हापूरच्या महापौर अश्विनी रामाणे या बंदच्या समन्वयक असून, त्यांच्या नेतृत्त्वाखाली कोल्हापूर शहरामध्ये एक मोर्चाही काढण्यात आला आहे. या मोर्चावेळीच रिक्षांची तोडफोड करण्यात आली. कोल्हापूरच्या हद्दवाढीच्या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी बुधवारी विधानभवनाबाहेर लाक्षणिक उपोषणही केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ऑगस्टला सर्वपक्षीय बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
कोल्हापूरच्या हद्दवाढीवर अहवाल तयार करण्यासाठी राज्य सरकारने जूनमध्ये एक द्विसदस्यीय समिती नेमली होती. या समितीने जूनमध्ये कोल्हापूर शहरात येऊन हद्दवाढीचे समर्थक आणि विरोधक यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळीही हद्दवाढीच्या विरोधकांनी १८ गावांमध्ये कडकडीत बंद पाळला होता. या समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केला आहे.