तळा पोलिसांच्या दडपशाहीविरोधात शुक्रवारी तळा शहरातील नागरिकांनी आंदोलन पुकारले होते. तळा बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. विशेष म्हणजे या बंदला सर्व पक्षांनी पािठबा दिला. गुरुवारी तळा तालुक्यात गोिवदोत्सव शांततेत पार पडत असताना तळा शहरात गोिवदांच्या दोन गटांत वाद झाला. हा वाद दोन्ही गटांनी लगेच सामंजस्याने मिटवला. परंतु सायंकाळी पोलिसांनी दोन्ही गटांतील तरुणांची धरपकड सुरू केली. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. धरपकड सुरू झाल्यानंतर तळ्यातील सामाजिक कार्यकत्रे तसेच राजकीय पक्षांचे कार्यकत्रे, लोकप्रतिनिधी यांनी तळा पोलीस ठाण्यात धाव घेतली.

दोन्ही गटांनी आपसात हे प्रकरण मिटवले असताना कारवाईची गरज नाही, अशी भूमिका या सर्वानी मांडली. परंतु पोलीस ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. नागरिकांनी सामंजस्याची भूमिका घेतली असतानाही पोलीस दंडेलशाही करीत असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख रवि मुंढे यांनी केला आहे.  जोपर्यंत पोलीस निरीक्षक संजय साबळे यांची बदली होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असे मुंढे यांनी सांगितले. एकमेकांचे कट्टर वैरी असलेले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष या मुद्दय़ावर पोलिसांच्या विरोधात एकत्र आले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शुक्रवारच्या बंदमुळे तळा शहरातील सर्व व्यापारीपेठा बंद होत्या. अतिशय दुर्गम आणि ग्रामीण असलेल्या या तालुक्यासाठी तळा ही एकमेव बाजारपेठ आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हातांनी परत जावे लागले.

दरम्यान, या संदर्भात तळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय साबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की गुरुवारी दहीहंडीदरम्यान जो प्रकार झाला त्याची तक्रार देण्यासाठी एक गट आला होता. त्यानंतर दुसऱ्या गटातील लोकांना बोलावले. याबाबत आता कुठलीही तक्रार नाही. परंतु आम्ही आमची प्रक्रिया पूर्ण केली असल्याचे साबळे यांनी स्पष्ट केले.