एकीकडे प्रवाहातील राजकीय पक्षांचे उमेदवार आणि दुसरीकडे विचारांची लढाई. नगर लोकसभा मतदारसंघातील तिन्ही प्रमुख उमेदवारांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला आपापल्या विजयाचे दावे केले. मतदारांनी मोठय़ा संख्येने मतदानाला बाहेर पडावे असा तिघांचा समान धागाही यात होता. ‘लोकसत्ता’शी बोलताना त्यांनी या भावना व्यक्त केल्या.
दिलीप गांधी (भाजप)
पक्षाचे ज्येष्ठ नेते अडवाणी यांच्या हस्ते माझ्या प्रचाराचा शुभारंभ झाला. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगता केली. दरम्यानच्या काळात पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचीही प्रचार सभा झाली. या सगळय़ा गोष्टी माझ्या विजयाचेच द्योतक आहे. महायुतीतील सहाही घटक पक्ष, त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन महायुतीचा उमेदवार लोकांपर्यंत पोहोचवला. मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे चारही आमदार ही माझ्या दृष्टीने मोठी जमेची बाजू आहे. या चारही आमदारांनी त्यांच्या मतदारसंघांत माझ्या विजयाचा मार्ग आणखी प्रशस्त केला आहे. स्वत:ची निवडणूक समजूनच ते गेले महिनाभर सतत कार्यरत होते. लोकांमध्ये मोदींचे मोठे आकर्षण असून, ही निवडणूक त्यांच्याभोवतीच केंद्रित झाली आहे. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मोदींनाच पंतप्रधानपदी बसवण्याचा निश्चय मतदारांनी केला असून, त्यामुळेच माझा विजय निश्चित आहे. या जोरावरच मतदार संसदेतील माझी हॅटट्रिक पूर्ण करतील.
राजीव राजळे (राष्ट्रवादी)
नगर मतदारसंघातील निवडणूक दुरंगी झाली तेथेच राष्ट्रवादीने निम्मी लढाई जिंकली आहे. या मतदारसंघात अजूनही काँग्रेसचेच प्राबल्य आहे. केवळ मतविभागणीमुळे विरोधकांना त्याचा लाभ झाला, तो आता होणार नाही. मतदारसंघात कोणतीही लाट नाही. दोन्ही काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते गेले महिनाभर झटून प्रचारात सक्रिय होते, त्यामुळे मोठी वातावरणनिर्मिती होऊ शकली. मागच्या काही वर्षांत मतदारसंघाची झालेली पिछेहाट लोकांच्या डोळय़ांसमोर आहे. संसदेत प्रभावी बाजू मांडली न गेल्याने यात मोठय़ा अडचणी आल्या. त्याचे विपरीत परिणाम विकासकामांवर झाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव, गृहमंत्री आर. आर. पाटील, बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी या मतदारसंघात लक्ष केंद्रित केले होते. त्याचाही मोठा फायदा होईल. आमदार म्हणून केलेले काम लोकांसमोर अजूनही आहे. त्या वेळी प्रभावीपणे मतदारसंघाची बाजू विधिमंडळात मांडली होती. ही पाश्र्वभूमी आणि दोन्ही काँग्रेसचे नेते व पदाधिका-यांना मिळालेल्या प्रतिसादामुळे माझा विजय निश्चित आहे.  
माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे (अपक्ष)
माझी लढाई वैचारिक आहे. लोकशाहीला घाणीतून बाहेर काढणे हा आपला निवडणुकीमागचा मुख्य हेतू असून त्याला मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. मी कोणालाही रुपया दिला नाही, कोणाचा रुपया घेतला नाही. निवडणुकीसाठी मला अनेकांनी पैसे देऊ केले होते, मात्र ते मी नाकारले. कारण विचारांची लढाई म्हणूनच मी या निवडणुकीकडे पाहतो. उमेदवारी जाहीर करतानाच मतदारांना दिलेल्या शब्दाला मी जागलो आहे. गाडगेबाबांची प्रेरणा घेऊन मी समाजकारणाला सुरुवात केली. आताही कोणत्याही पक्षात गेलो असतो, तरी मला त्यांची उमेदवारी मिळाली असती, मात्र विचारांच्या लढाईत ते मला सयुक्तिक वाटले नाही. माझ्या या विचारांना मतदारांचाही उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. आजही अनेक पक्षांचे नेते माझाच प्रचार करीत आहेत. माझे वैचारिक मतभेद असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याही काही कार्यकर्त्यांनी माझ्या उमेदवारीचे स्वागत करताना ते प्रचारातही सक्रिय झाले. या सर्वाच्या पाठिंब्यावर विचारांची लढाई मी जिंकली आहे, त्याचीच पुनरावृत्ती मतदानातही होईल याची खात्री वाटते. निकाल काहीही लागो, नगरकरांना आता मी वा-यावर सोडणार नाही, मात्र कोणाच्या राजकारणातही ढवळाढवळ करणार नाही.
भाऊसाहेब वाकचौरे (काँग्रेस)
माझा जन्म मतदारसंघातला, मी कसा आहे, कसा वागतो, काय करतो याची ओळख लोकांना असून ‘आपला माणूस आपल्यासाठी’काम करणारा, प्रश्नांची जाण असणारा असल्याने निवडणुकीत यश मिळणारच, विरोधी उमेदवाराकडे पात्रता नव्हती. मौनी आमदार म्हणून यापूर्वीची त्यांची कारकीर्द होती. त्यांच्याकडे मुद्दे नव्हते. त्यामुळे निवडणूक ही वेगळय़ा मुद्यावर नेण्याचा प्रयत्न केला. पक्षांतर हा मुद्दा नव्हताच विरोधकांनी लपून का प्रचार केला, लोकांपर्यंत ते का गेले नाहीत, दहशत निर्माण करणा-यांना जनता धडा शिकवील. उन्मत होऊन वागलेले लोकांना चालत नाही. लोक त्यांना धडा शिकवतील. साईबाबांचा आशीर्वाद, जनतेचे पाठबळ याच्या जोरावर माझा विजय हमखास होईल, तो विजय जनतेचाच असेल.
नितीन उदमले (आम आदमी)
गुणवत्ता, पात्रता व विकासाच्या मुद्यावर सज्ञान व सुशिक्षित नागरिकांची पहिली पसंती मलाच मिळेल. रोजगाराचा मुद्दा तरुणांना भावला, जातिधर्माचे राजकीय भांडवल केले नाही, त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतदारांचा पािठबा मिळाला. भ्रष्टाचाराला लोक विटले आहेत. स्थानिक पातळीवरील प्रस्थापितांच्या विरोधात ते आहेत. त्यामुळे या नेत्यांच्या प्रभावाखाली जनता जाणार नाही. माझी वैयक्तिक कामगिरी सरस असल्याने प्रचारात आस्थेचे वातावरण जाणवले. प्रस्थापित बरोबर आहे म्हणून निवडणूक लढविणारे व मोदींना पंतप्रधान करायचे असा प्रचार करून नकारात्मक वातावरण निर्माण करणारे दोन्ही उमेदवारांकडे विकासाची दूरदृष्टी, कार्यक्रम नाही हे लोकांना समजले आहे. त्यामुळे दोघांचीही राजकीय दुकानदारी बंद करण्याची जनतेची इच्छा आहे. पैसा, यंत्रणा यांचा अभाव असतानाही जास्तीतजास्त मतदारांपर्यंत गेलो. सकारात्मक भूमिका व आरोप-प्रत्यारोप न करता समतोल प्रचार केल्याने तो जनतेला भावला. त्यामुळे लोक विरोधकांना जागा दाखवतील.
सदाशिव लोखंडे (शिवसेना)
विरोधी उमेदवाराकडे मंत्री, आमदार व प्रस्थापित नेते होते. त्यांच्याकडे मालक होते तर माझ्याकडे साडेचौदा लाख मतदार होते. मालक विरुद्ध सामान्य जनता अशी लढत झाली. अंतिम टप्यात निवडणूक जनतेने हातात घेतली. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे असल्याने लोकांचा पाठिंबा मिळाला. साईबाबांची खोटी शपथ घेतली, शिवसेनेच्या प्रमुखांना तर फसवलेच, पण खासदारकीचा दर महिन्याचा पगार मंदिरांना देण्याचे जाहीर केले, पण ते दिले नाही. साठ महिन्यांत साठ देवांना फसवले. ते आता मतदारांना फसवतील हे लोकांना समजल्याने निवडणूक लोकांनीच हातात घेतली. १५ वर्षे आमदार, जिल्हा बँकेचा संचालक म्हणून काम करताना सर्व गटातटांना बरोबर घेतले. विकासकामे केली. ही कामे करताना भेदभाव केला नाही. स्वार्थी वागलो नाही, त्यामुळे सर्वाचाच निवडणुकीत पाठिंबा मिळाला. ऐन वेळी उमेदवारी मिळाली. सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्वत: बोलावून ती दिली. कार्यकर्त्यांनी काम केले. लोकांचा विश्वास मिळाला, त्यामुळे कोणी कितीही यंत्रणा उभी केली, आमिष दाखवले तरी फरक पडणार नाही. लोक विखेंनाही जागा दाखवणार आहेत. मालक विखे विरुद्ध सामान्य जनता या लढाईत माझाच विजय होईल.