आंबोली घाटात वर्षां पर्यटनासाठी दरवर्षी पर्यटकांची गर्दी वाढत असूनही सार्वजनिक बांधकाम आणि वनखात्याच्या समन्वयाअभावी भीतीची टांगती तलवार डोक्यावर असते. सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्यावरील गटाचे काम करीत नसल्याने रस्त्यावर पाणी येऊन निकृष्ट  डांबरीकरणाचे नमुने सर्वासमोर उभे राहत आहे. त्यामुळे आंबोलीचा पर्यटन हंगाम चिंतेतच असतो.

आंबोली, चौकुळ व गेळे भागांत वर्षां पर्यटनासाठी पर्यटक मोठय़ा प्रमाणात येतात. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निकृष्ट रस्ते, गटार कामांमुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होते तसेच पर्यटकांनाही त्रास होतो. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मागील पाच वर्षांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी सव्‍‌र्हे केला असता बेनामी ठेकेदारी उघड होणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे आंबोली विश्रामगृह तर निकृष्ट व भ्रष्टाचाराचा एक नमुना म्हणून लोकांमध्ये चर्चिला जात आहे.

आंबोली घाटात लघुशंकेला बेळगाव बैलहोंगलचा तरुण गेला असता पाय घसरून दरीत कोसळण्याचा प्रकार घडला. तो जागीच ठार झाला. वास्तविकत: घाटात बांधकाम खात्याने दिशादर्शक, धोकादायक फलक लावण्याची गरज आहे, पण त्यांची वानवा आहे.

बांधकाम खात्याने आपत्ती निवारणासाठी मक्तेदारांची दरपत्रकानुसार निवड केलेली नाही. ज्या वेळी दरड किंवा दगड कोसळतील तेव्हा बांधकाम खात्याच्या ठरलेल्या दराप्रमाणे मनाला वाटेल त्या जेसीबीधारक ठेकेदाराला आंबोलीत पाठविण्याचा कित्ता दरवर्षी गिरविला जातो, असे धक्कादायक वृत्त आहे.

आंबोलीत वर्षां पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या मुद्दय़ावर सार्वजनिक बांधकाम, वनखाते व पोलीस विभागाची एकत्रित कोणतीही पॉलिसी नाही. हे तिन्ही विभाग आपत्ती घडण्याची वाट पाहत असतात. वास्तविकत: सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे