गाजावाजा करत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेली अद्ययावत ‘बोट रूग्णवाहिका’  दोन महिन्यांपासून वापराविना नर्मदा काठावर धूळखात पडून आहे. विशेष म्हणजे प्रत्येकी दीड कोटी रुपये किमतीच्या, परंतु लोकार्पण न झालेल्या अजून दोन बोट रूग्णवाहिका सरदार सरोवर धरणाच्या काठावर पडल्या आहेत. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचा फटका नर्मदेच्या काठावरील गरीब आदिवासींच्या आरोग्याला बसला आहे.

नर्मदा नदीकाठावर वसलेल्या अतिदुर्गम भागातील गावांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा म्हणून जानेवारीत बोट रूग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले होते. धडगाव तालुक्यातील भुशा येथे झालेल्या कार्यक्रमात ही बोट आतापासूनच लोकांच्या आरोग्य सेवेत कार्यरत होणार असल्याची ग्वाही सावंत यांनी दिली होती. ही बोट दोन क्रेनच्या सहाय्याने लोकार्पणासाठी पाण्यात उतरविण्यात आली होती. लोकार्पणानंतर ही बोट सरदार सरोवराच्या गेटजवळ आणण्यात आली. त्यानंतर त्याठिकाणची पाणी पातळी कमी झाल्याने आता या बोटीचा तळ जमिनीला लागला आहे.

बोट रूग्णालय खरेदी आणि हस्तांतरणाची प्रकिया मुंबई येथील आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यालयात झाली. ही बोट रूग्णालय प्रत्यक्षात एक जून रोजी नंदुरबारच्या आरोग्य विभागाच्या ताब्यात आली. रूग्णालयाची नोंदणी आणि विमाही याच तारखेपासून कार्यरत झाल्याने बोटीचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या नंदुरबारच्या आरोग्य प्रशासनाला ही बोट जमिनीवर उभी असल्याचे दिसून आले.

सरदार सरोवराची पातळी वाढण्यासाठी अजून दोन महिन्यांचा अवधी लागणार आहे. पाणी बोटीखाली आल्यानंतरच प्रशासनाला ती हलविता येणार आहे. त्यानंतरच तिचा प्रत्यक्षात वापर सुरु होऊ शकेल. इतर दोन बोट रूग्णालयेही वापरासाठी तयार आहेत. नर्मदेच्या काठावर आणण्यात आलेल्या या बोट रूग्णालयांची नोंदणी प्रक्रिया आणि विमा अद्याप झालेला नसल्याने त्याही वापराविना पडून आहेत.