लातूर ग्रामीण मतदारसंघातून आमदार दिलीपराव देशमुख यांनी निवडणूक लढवावी, असे साकडे राज्यमंत्री अमित देशमुख यांनी ग्रामीण मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात घातले.
शहर व ग्रामीण मतदारसंघांतील निवडणूक तयारीसाठी काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. अॅड. व्यंकट बेद्रे, मोईज शेख, धीरज देशमुख, एस. आर. देशमुख, चांदपाशा घावटी, विक्रम गोजमगुंडे आदी उपस्थित होते. मंत्री देशमुख यांनी, दिलीपराव देशमुख यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, असे म्हणताच सर्व कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत अमित देशमुखांच्या म्हणण्यास पािठबा असल्याचे म्हटले.
विधानसभेत महायुती टिकल्यास पक्षासमोर मोठे आव्हान असेल. लढाही ‘महाभारता’तील असेल. या लढाईत भीम व अर्जुनाचे सारथ्य करण्याचीच आपली भूमिका आहे. आपण थेट हातात शस्त्र न धरता श्रीकृष्णाची भूमिका वठवणे पसंत करणार असल्याचे ते म्हणाले. कार्यकर्त्यांची भावना मी समजू शकतो. परंतु कार्यकर्त्यांनी कोणतीही चिंता करू नये. सोनिया गांधी देतील त्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘अर्जुन’ कोण?
कार्यकर्त्यांच्या विनंतीचा आदर करूनही दिलीपराव देशमुख यांनी निवडणुकीत आपण उमेदवार नसल्याचे सांगून टाकले. लातूर शहर मतदारसंघात ‘भीम’ अमित देशमुख आहेत, हे स्पष्ट आहे. ग्रामीणमधून अर्जुन धीरज देशमुख की विद्यमान आमदार वैजनाथ िशदे, यशवंत पाटील, एस. आर. देशमुख, त्र्यंबक भिसे की आणखी कोण? याची चर्चा मेळाव्यात लगेच सुरू झाली.