भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शुक्रवारी दिवसभर नागपुरात तळ ठोकून रा. स्व. संघाच्या उच्चपदस्थ नेत्यांशी चर्चा केली. जम्मू- काश्मीरमधील ताज्या राजकीय घडामोडींच्या संदर्भात या भेटीला महत्त्व दिले जात आहे.
शाह यांचे सकाळी नागपुरात आगमन झाले. रविभवन विश्रामगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या शहरातील नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शाह यांची ही दुसरी नागपूर भेट होती.
यानंतर शाह महालमधील संघ मुख्यालयात गेले आणि त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्याशी चर्चा केली. खासदार अजय संचेती हेही या वेळी हजर होते, असे सूत्रांनी सांगितले.
जम्मू- काश्मीरमध्ये मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या नेतृत्वाखाली पीडीपी- भाजपचे सरकार स्थापन झाल्याच्या पाश्र्वभूमीवर, तसेच शपथविधीनंतर सईद यांनी काश्मीरमधील निवडणुका शांततेत होण्याचे श्रेय पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांना दिल्याच्या पाश्र्वभूमीवर अमित शाह व संघाचे नेते यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले.
सरकारने आणि स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुफ्ती यांच्या वक्तव्यापासून स्वत:ला वेगळे केले, तसेच काश्मीरमधील निवडणुका शांततापूर्ण वातावरणात पार पडण्याचे श्रेय निवडणूक आयोग, सुरक्षा दले व काश्मीरचे नागरिक यांनाच असल्याचे ठासून सांगितले असले तरी पक्षात याबाबत कुरबुर सुरूच आहे. सईद यांनी सरकार स्थापनेच्या पहिल्याच दिवशी अपशकुन केल्याचे काहीजणांचे मत आहे, असे संघाच्या निकटस्थ सूत्रांनी सांगितले.
काश्मीरमधील राजकीय मुद्दय़ांशिवाय, भूसंपादन विधेयकाबाबतही संघाच्या नेत्यांशी चर्चा केल्याचा अंदाज आहे. सायंकाळी पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर शाह रात्री नवी दिल्लीला रवाना झाले.