भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उद्या सकाळी उपराजधानीत येणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिखर संस्थेची पुढील आठवडय़ात होणाऱ्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या पाश्र्वभूमीवर अमित शहा नागपूरात येणार असून ते स्मृतीभवनला भेट देऊन त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान अखिल भारतीय प्रतिनिधी सभा आयोजित करण्यात आली असून या बैठकीत अनेक फेरबदल होण्याची शक्यता आहे. विशेषत भाजपाचे ज्येष्ठ नेते संजय जोशी यांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात संघात विचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक समिती नियुक्त करण्याचा संघाचा विचार त्यादृष्टीने हा विषय चर्चेला येणार आहे. शिवाय, सभेमध्ये कुठले विषय चर्चेला घ्यावे लागेल, या संदर्भात उद्यापासून महालातील संघ मुख्यालयात तीन दिवस संघाच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि भैय्याजी जोशी नागपुरात दाखल झाले आहेत. याशिवाय, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरात आहेत.
या पाश्र्वभूमीवर अमित शहा यांचा नागपुरात दौरा अचानक ठरल्याने त्याची राजकीय क्षेत्रात चर्चा होऊ लागली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुफ्ती मोहमंद सईद यांनी केलेल्या विधानावर देशभरात प्रखर टीका झाली. भाजपने मुफ्ती मोहमंद यांच्या विधानाशी आमचा संबंध नसल्याचे सांगितले. त्यामुळे या विषयावर चर्चा होणे अपेक्षित आहे. अमित शहा यांचे सकाळी वाजता नागपुरात आगमन झाल्यावर ते रविभवनला  काही काळ थांबतील. त्यानंतर ते रेशीमबागेतील स्मृतिभवनात जाऊन आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि डॉ. गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतील आणि त्यानंतर महालातील संघ मुख्यालयात जातील.
मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील आणि सायंकाळी दिल्लीला रवाना होतील. उद्या सकाळी ७ वाजता ते नागपुरात येणार असल्यामुळे कार्यकर्त्यांंनी त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर राहावे, असे आवाहन भाजपाचे शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे यांनी केले आहे.