अमरावती ते धुळे महामार्ग क्र. ६ व जळगाव ते गुजरात सीमा या विदर्भातील व खानदेशातील रस्त्यांच्या रुंदीकरण प्रकल्पांमधून एल.अ‍ॅण्ड टी.कंपनीने काढता पाय घेतल्याचे समजते. त्यामुळे तब्बल एकूण साडेचार हजार कोटी रुपयांचे हे प्रकल्प गेल्या तीन वर्षांपासून रखडले असून हे रुंदीकरण पूर्ण होण्याला आणखी किती काळ लागेल, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
नागपूर ते अमरावतीपर्यंत चौपदीकरणाचे काम पूर्ण झाले असून अमरावती ते धुळेपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या ३ वर्षांपासून मंद गतीने सुरू आहे. मात्र, जमिनी भूसंपादन करणे, जमिनीला किंमत ठरविणे, निवाळे देणे न्यायालयीन प्रक्रिया आदी प्रकरणामुळे हा चौपदरीकरणाचा मार्ग वादग्रस्त ठरलेला आहे. विदर्भ व खान्देशच्या दळणवळण सुविधेत महत्वपूर्ण ठरणाऱ्या व विकासाला वेगळा आयाम देण्याची क्षमता असलेल्या या हायवे प्रकल्पाचे काम सध्या अडचणीत सापडले आहे. या परिसराचा विकास होण्याची मोठी क्षमता या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ मध्ये आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांंपासून त्याचे रुंदीकरण रखडल्याने त्याचा मोठा परिणाम येथील दळणवळण क्षेत्रासह या परिसराच्या विकासावरही झाला आहे.
विदर्भ व खान्देशला जोडणाऱ्या अमरावती ते धुळे या महामार्गाच्या बीओटी अंतर्गत चौपदरीकरणासाठी नॅशनल हायवे ऑफ इंडियाने (न्हाई) २०११ मध्ये निविदा प्रसिध्द केल्या होत्या. तसेच, जळगाव ते गुजरात सीमा या हायवेच्या बीओटी तत्वावरील रुंदीकरणासाठी न्हाईने २०१२ मध्ये निविदा प्रसिध्द केली होती. या दोन्ही प्रकल्पांसाठीच्या निविदांची छाननी झाल्यानंतर लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनीला दोन्ही हायवेचे काम देण्यात आले. धुळे ते अमरावती या कामाची किंमत सुमारे २३५८ कोटी रुपये, तर जळगाव ते गुजरात सीमा या कामाची किंमत सुमारे १९६८ कोटी रुपये आहे.
या दोन्ही महामार्गाच्या माध्यमातून एकूण ४८५ किलोमीटर लांबीचे रुंदीकरण केले जाणार असून त्यांचे भूसंपादन सध्या अंतिम टप्प्यात आहे. मात्र, न्हाईतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एल.अ‍ॅण्ड टी. कंपनीने या दोन्ही महामार्गाचे काम न करण्याबाबत न्हाईला पत्र दिले आहे. यासंदर्भात न्हाईचे अमरावती येथील प्रकल्प संचालक प्रशांत फेगर्डे यांनी त्यास दुजोरा दिला असून अद्याप याबाबत कुठीलेही पत्र मुख्यालयाकडून प्राप्त झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. एल.अ‍ॅण्ड टी. कंपनीच्या अधिकाऱ्यांशी या संदर्भात संपर्क होऊ शकलेला नाही.
दरम्यान, याप्रकरणी न्हाईने अंतिम निर्णय घेतलेला नाही. एल.अ‍ॅण्ड टी. व शासनामध्ये वाद सुरू असल्याने तसेच अमरावती ते धुळेपर्यंत जमिन संपादित करणे व आदी तांत्रिक बाबी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या पूर्ण झाल्या तर काही ठिकाणी प्रकल्पग्रस्तांनी जमिनी देण्यास व इतर समस्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ च्या या चौपदरीकरणाचे काम थंडबरस्त्यात पडले आहे. या चौपदरीकरणाच्या या सर्व समस्यांचे निराकरण होण्याकरिता वेळ लागणार, तर लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या नवीन सरकार स्थापनेनंतरच पुन्हा या महामार्गाच्या कामाला गती देण्याचे काम नवीन सरकारकडूनच होईल, एवढे मात्र निश्चित.