गेल्या वेळच्या केवळ सात जागांवरून भाजपने सर्वाधिक जागा जिंकून अमरावती महापालिकेत सत्ता स्थापनेकडे वाटचाल केली आहे. भाजपने शहरी भागात आपली पाळेमुळे घट्ट केल्याचे हे निदर्शक आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दुबळेपण भाजपच्या पथ्यावर पडले. शिवसेनेने आक्रमक प्रचार करूनही अपेक्षित यश मिळू शकले नाही. त्या तुलनेत पहिल्याच प्रयत्नात एमआयएमने घेतलेली झेप ही काँग्रेससाठी धोक्याची घंटा ठरली आहे. बसपनेही गेल्या निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती केली आहे. भाजपचे आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्याकडे भाजपच्या प्रचार यंत्रणेची धुरा होती. सर्व गटातटांना सांभाळून घेण्यासाठी त्यांना कसरत करावी लागली, पण बहुतांश ठिकाणी त्यांची खेळी यशस्वी ठरली. गेल्या निवडणुकीत भाजपला केवळ सात जागा मिळाल्या होत्या. या वेळी क्रमांक एकचा पक्ष म्हणून भाजपने मारलेली मुसंडी ही लक्षवेधी ठरली आहे. काँग्रेसला सुरुवातीपासून सूरच गवसला नाही. एकाही बडय़ा नेत्याची सभा अमरावतीत झाली नाही. काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी या वेळी फारसा उत्साह दाखवला नाही. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके पदवीधर मतदारसंघात पराभूत झाल्याने त्यांचा प्रभाव जाणवला.

दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीरसभा आणि नियोजनबद्ध आक्रमक प्रचार भाजपसाठी अनुकूल बाबी ठरल्या. काही भागात मात्र भाजपला प्रवेश मिळाला नाही.

शिवसेनेलाही अपेक्षित यश मिळू शकले नाही. ज्या भागात शिवसेनेचे समर्थक मोठय़ा प्रमाणावर दिसून येतात तेथेही भाजपने बाजी मारली. शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्या गटासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे.

  • राष्ट्रवादी काँग्रेसचा या निवडणुकीत धुव्वा उडाला आहे. संजय खोडके राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यावर स्थानिक पातळीवर नवे नेतृत्व उभे झाले नाही.
  • राष्ट्रवादीच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा झेंडा उंच केला. मात्र युवा स्वाभिमानलाही मतदारांनी नाकारले.
  • एमआयएमने पहिल्याच झटक्यात सहा जागा मिळवून दमदार प्रवेश केला आहे. इतर पक्षांनाही फारसा वाव मिळू शकला नाही.