शिवसेनेत परस्परांचे विरोधक समजले जाणारे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासह काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भाई जगताप यांनी एकाच व्यासपीठावर हजेरी लावत दापोली विधानसभा मतदारसंघातील नवीन राजकीय समीकरणांचे स्पष्ट संकेत दिले. दाभोळमधील एका खासगी आयटीआयच्या शुभारंभप्रसंगी या तिन्ही नेत्यांचे मनोमीलन त्याचेच द्योतक ठरले आहे. दरम्यान, हे तीनही नेते बाहेर पडल्यानंतर सभागृहात प्रवेश करणारे राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम स्वतचे ‘हेवीवेट’ वलय निर्माण करण्यात अपयशी ठरले. तसेच माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि त्यांच्या समर्थकांची गरहजेरी त्यांच्या राजकीय अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. अल्पसंख्याक समाजाच्या पुढाकाराने झालेला हा कार्यक्रम शैक्षणिकदृष्टय़ा महत्त्वाचा असल्याने यासाठी दापोलीसह आजूबाजूच्या परिसरातून अल्पसंख्याक बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

मुळात, दापोली नगर पंचायतीत शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी आघाडीतील काँग्रेसचा हात धरताना रामदास कदम आणि भाई जगताप यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. मात्र त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या राष्ट्रवादीने तीन जिल्हा परिषद गट आणि सात पंचायत समिती गण ताब्यात घेतले, तर काँग्रेस उमेदवारांचा दणदणीत पराभव झाला. या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने राष्ट्रवादीला शह देण्याच्या हेतूने शिवसेनेची पाठराखण करण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट संकेत आता मिळत आहेत.

दुसऱ्या बाजूला रामदास कदम यांनी चिरंजीव योगेश कदम यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करताना एकेकाळचे कट्टर विरोधक शिवसेना नेते अनंत गीते यांच्याशी दिलजमाई केली आहे. गीते यांच्यासह भाई जगताप यांच्याशी झालेल्या राजकीय मत्रीमुळे मतदारसंघात कदम पित्रापुत्रांची ताकद वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या राजकीय समीकरणाने मागील विधानसभा निवडणूक आणि पंचायत समिती निवडणूक जिंकणाऱ्या राष्ट्रवादीच्या खच्चीकरणाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दुसऱ्या बाजूला २५ वष्रे आमदार राहिलेले शिवसेना नेते सूर्यकांत दळवी यांना या कार्यक्रमात स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या राजकीय अस्तित्वावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.