दक्षिण सोलापूर तालुक्यातील कारकल येथे सोलापूर विद्यापीठातील पुरातत्त्वशास्त्र विभागाने केलेल्या उत्खननात आद्य ऐतिहासिक कालखंडांचे तसेच रोमन संस्कृतीचे पुरावे आढळून आल्याचे विभागप्रमुख डॉ. माया पाटील यांनी सांगितले.
भीमा नदीच्या तीरावर कारकल हे छोटेस गाव आहे. या ठिकाणी प्राचीन संस्कृतीच्या खुणा आढळून आल्या. त्यामुळे पुरातत्त्वीय उत्खननासाठी सोलापूर विद्यापीठाच्या मान्यतेने नवी दिल्लीच्या भारतीय पुरातत्त्वशास्त्र सर्वेक्षण विभागाकडे प्रस्ताव आला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष उत्खनन कार्याला प्रारंभ झाला.
या उत्खननात वेगवेगळ्या काळ्या-लाल मातीच्या भांडय़ांचे तुकडे, प्राचीन ऐतिहासिक कालखंडाची वैशिष्टय़े असलेली भांडी, काळ्या-लाल रंगाची, काळ्या रंगाने नक्षीकाम केलेली खापरे, रोमन पॉलिश असलेल्या मातीच्या भांडय़ांचे तुकडे, साठवणीच्या रांजणाचे तुकडे, मातीचा दिवा, नक्षीदार तबके, शंखांपासून बनवलेल्या बांगडय़ांचे तुकडे, मणी, कानातील आभूषणे, सुपारीच्या आकाराचे मातीचे मणी, कार्लेनियन, अ‍ॅगेट, क्रिस्टल यासारख्या मौल्यवान दगडांचे मणी, वेगवेगळे रंग व एकत्रित असणाऱ्या काचेच्या बांगडय़ांचे तुकडे आणि मणी आदी पुरातन अवशेष सापडले आहेत. याशिवाय खेळण्यांमधील मातीचे भाजलेला घोडा, बैल, एडका हे प्राणी तसेच स्त्री-प्रतिमेचे तुकडे, घरांचा पाया, पोस्टहोल कुंभाराची भट्टी, चुलीचे अवशेष, मानवी आणि प्राण्यांची हाडे, जळालेले धान्य आदी अवशेष मिळाले आहेत. डॉ. माया पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी माढा तालुक्यातील वाकाव परिसरात उत्खननकार्य पार पडले होते. कारकल येथील उत्खनन क्षेत्रास सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जगदीश पाटील, डेक्कन अभिमत विद्यापीठ व संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलूरकर, डॉ. वसंत शिंदे आदींनी भेट देऊन पाहणी केली. या उत्खननात ज्ञानेश्वरी हजारे, प्रा. प्रभाकर कोळेकर, प्रा. सोनाली गिरी, लक्ष्मी पवार, सदाशिव देवकर, सुनील पिसके, किशोर चलवादी यांच्यासह २५ पदव्युत्तर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.