बफर झोनमध्ये पर्यटकांची अक्षरश: गर्दी

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये पाणवठय़ांवरील प्रगणनेत ४० वाघांसह २ हजार ४७८ वन्यप्राण्यांची नोंद घेण्यात आल्याने बफर झोनमध्ये पर्यटकांची अक्षरश: गर्दी उसळली आहे. दरम्यान. बफरमध्ये सहा प्रवेशव्दारातून केवळ ४० गाडय़ांना प्रवेश असल्याने अनेकांच्या पदरी निराशा पडत असून पर्यटकांच्या या गर्दीला सांभाळतांना आणि त्यांचे समाधान करतांना वनाधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफर झोन सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. कारण, बफर झोनमध्ये सध्या पट्टेदार वाघांची चांगली साईटिंग सुरू आहे. त्यामुळे शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी पर्यटकांची विक्रमी गर्दी बफर झोनच्या प्रवेशव्दारांवर बघायला मिळत आहे. कारण, वाघांच्या साईटिंगसोबतच नुकत्याच झालेल्या पाणवठय़ांवरील गणनेत ४० वाघांसह १२ बछडे व २ हजार ४७८ वन्यप्राण्यांची प्रगणकांनी नोंद घेतली. इतक्या मोठय़ा संख्येत बफरमध्ये वन्यप्राणी आणि साईटिंग होत असल्याने पर्यटकांची गर्दी आता बफर क्षेत्राकडे वळली आहे. बफरमध्ये पाणवठय़ांवरील गणनेत १२ बिबटे, ७५ भेडकी, ३७४ चितळ, १२८ सांबर, ४२ निलगाय, २७२ रानगवा, ६३१ माकडे, ९० अस्वले, ४४ रानकुत्रे, ८ कोल्हे, ५७३ रानडुक्करे, १५ उदमांजरी, १ सायळ, १५ मुंगूस, १०१ मोर, ८ रानकोंबडय़ा, १० ससे व ३३ इतर प्राणी दिसले. इतक्या मोठय़ा संख्येत बफर क्षेत्रातच वन्यप्राणी असतांना आणि गाईडचे ३०० रुपये व प्रवेश शुल्क ३०० रुपये, असे एका गाडीला केवळ ६०० रुपये शुल्क लागत असल्याने पर्यटकांनी आपला मोर्चा बफर क्षेत्राकडे वळविला आहे.

प्रस्तुत प्रतिनिधीने शनिवारी बफरच्या नवेगाव चौकी प्रवेशव्दाराला भेट दिल्यावर पर्यटकांची विक्रमी गर्दी बघायला मिळाली. बहुसंख्य पर्यटकांना प्रवेश न मिळाल्यामुळे निराश होऊन परतावे लागले. मात्र, अशा पर्यटकांना बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. बफर क्षेत्रात एकूण ६ प्रवेशव्दारे आहेत. यात देवाडा-अडेगांव प्रवेशव्दारावर १२ गाडय़ा, नवरगांव चौकी-आगरझरी ८, जुनोरा ६, कोलारा ६, रामदेगी-नवेगांव ४ व अलीझंजा येथून ४, अशा एकूण ४० गाडय़ांना प्रवेश दिला जातो.

विशेष म्हणजे, पर्यटकांना व्याघ्रदर्शनाचा आनंद मिळत असल्यामुळे सहाही प्रवेशव्दारांवर गर्दी उसळली आहे. बफर क्षेत्रातील या विक्रमी गर्दीला सांभाळणे कठीण झाल्याने या प्रवेशव्दारांवर कर्मचारी वाढविण्यात येणार आहेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी ताडोबा बफरचे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवने यांच्याशी संपर्क साधला असता बफर क्षेत्रातील गर्दी वाढली असल्यामुळे सहाही प्रवेशव्दारावर लवकरच ऑनलाईन बुकिंग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यासोबतच पर्यटकांना पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक त्या सोयीसुविधा येथे पुरविण्यात येणार आहेत.

सहाही प्रवेशव्दारांवर ताडोबा संदर्भातील विक्रीसाठी पुस्तके, वस्तू, टी शर्टस्, टोप्या ठेवण्यात येणार आहेत. शीतपेयांसह चहा, कॉफी, थंड पाणी आदींची सुविधा देखील येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमानुसार येथे गाडय़ांची संख्या कमी आहे. भविष्यात गाडय़ांची संख्या वाढू शकते, असेही ते म्हणाले.

बफर क्षेत्र आठवडाभर सुरू राहणार

बफर क्षेत्रातील गर्दी बघता खासगी गाडीने पर्यटक गेले, तर गाईडचे ३०० रुपये आणि ३०० रुपये प्रवेश शुल्कच घेतले जाते. मात्र, पर्यटकांची गर्दी बघता आता खासगी गाडय़ांना प्रवेशासाठी ६०० शुल्क आकारण्यावर ताडोबा व्यवस्थापन गंभीर विचार करीत आहे, तसेच दर मंगळवारी ताडोबा बफर क्षेत्र पर्यटनासाठी बंद असते. मात्र, आता मंगळवारची सुटी रद्द करून सातही दिवस पर्यटन सुरू राहणार असल्याची माहिती ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जे.पी. गरड यांनी दिली.