उमरगा नगरपालिकेच्या वतीने उमरगा-लातूर रस्त्यालगत मदानावर १० दिवसांपासून सुरू असलेल्या पशुप्रदर्शनात खिलार बलजोडीचा भाव तब्बल दीड लाखावर गेला होता. दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना पशुधन जगवणे कठीण होत असताना दीड लाखाची खिलार बलजोडी खरेदीची केवळ इच्छा होती. बहुतांश शेतकऱ्यांचा कल पशुधन विक्री करण्याकडेच होता. पशुप्रदर्शन व विक्रीत तब्बल दीड कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल झाली.
उमरगा नगरपालिकेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसायाला व शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे पशुधन याच भागात मिळावे, या हेतूने पशुप्रदर्शन भरविण्यात येते. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पशुधन खरेदी-विक्रीची सोय झाली आहे. प्रदर्शनात इंडी, विजापूर, गुलबर्गा, सोलापूर, लातूर आदी भागातून खिलार, लाल कंदारी, देवणी जातीचे पशुधन मोठय़ा प्रमाणात आणण्यात आले होते. प्रदर्शनात बलजोडीचा भाव ६० हजार रुपयांपासून दीड लाख रुपयांपर्यंत होता. मागील दहा दिवसांत जवळपास दीड कोटीची उलाढाल झाली.
उमरगा शहरासह तालुक्यात मागील तीन-चार वर्षांपासून सतत दुष्काळ पडत असल्याने व या वर्षीही दुष्काळाची तीव्रता भयानक आहे. या वर्षी जेमतेम पाऊस झाल्याने खरीप व रब्बी दोन्ही हंगाम वाया गेले. परिणामी आगामी काळात पशुधन कसे जगवावे या भीतीमुळे मोठय़ा जड अंतकरणाने पशुधनाची विक्री केली जात आहे. बाजारात पशुधन खरेदीस एकही शेतकरी पुढे येत नाही. बव्हंशी व्यापारीच पशुधन खरेदी मोठय़ा प्रमाणात करीत आहेत. खरेदीसाठी शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुभत्या जनावराला मागणी नाही. दुष्काळामुळे दुभत्या जनावराला मागणी नसल्यामुळे किमती कमी झाल्या आहेत.