सात जणांचे बळी घेणाऱ्या वाघाला नरभक्षक ठरविण्याची घाई करून लोकप्रतिनिधी, उत्साही वन्यजीवप्रेमी, वन अधिकारी व गावकऱ्यांनी संयुक्तपणे वाघाची ‘राजकीय हत्या’ केल्याची टीका होत आहे. दरम्यान, आज सकाळी मोहुर्ली येथे शवविच्छेदन केले असता ए.के. ४७ च्या सहा गोळ्या लागल्याने वाघाचा मेंदू व डोके पूर्णपणे फाटल्याचे निदर्शनास आले. यानंतर या वाघावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोंभूर्णा व परिसरात धुमाकूळ घालून सात जणांचे बळी घेणाऱ्या वाघाला नरभक्षक ठरवून पोलिस दलाच्या नेमबाजांनी काल गोळ्या घालून हत्या केली. वाघाच्या हत्येनंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून या राजकीय हत्येचा सर्वस्तरातूर जाहीर निषेध व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात तीन महिन्यात ठराविक अंतराने सात जणांचे बळी गेले आहेत. विशेष म्हणजे, हे सातही बळी एकाच वाघाचे नाहीत, असे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. त्याच्या डीएनए तपासणीसाठी बंगलोर व हैदराबाद येथे पाठविण्यात आले होते. डीएनए अहवालाची वाट न बघताच केवळ कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसून आलेल्या छायाचित्रांच्या आधारावर वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सर्जन भगत यांनी वाघाला नरभक्षक ठरवून गोळ्या घालण्याचे आदेश दिले. हे आदेश देण्यासाठी राजकीय दबाव मोठय़ा प्रमाणावर होता, अशीही माहिती आता समोर आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता मतदार आपल्यापासून दुरावू नये म्हणून आमदार आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार शोभा फडणवीस, माजी खासदार नरेश पुगलिया यांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी लावून धरली होती. त्यासाठी सातत्याने आंदोलन, धरणे, ठिय्या आंदोलने केली, तसेच तालुका पातळीवरील कॉंग्रेस, भाजप व राष्ट्रवादीचे नेते पदाधिकारीही या नेत्यांवर दबाव वाढवित होते. मग हेच नेते वनमंत्री, वनखात्याचे प्रधान सचिव व प्रधान मुख् वनसंरक्षकांवर राजकीय दबाव आणत होते. केवळ राजकारणीच नाही, तर स्थानिक गावकरी व वन अधिकारीही यात सहभागी झाले होते. गोळ्या घालण्याचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी देताच त्याला विरोध करण्याऐवजी काही उत्साही वन्यजीवप्रेमी पोलिस दल व वन विभागाच्या नेमबाजांना मदत करीत होते. यात माजी व आजी मानद वन्यजीव सदस्यांचाही समावेश आहे. माध्यमांसमोर वन्यजीवांविषयी प्रेम दाखवायचे आणि तिकडे जंगलात वनखात्याला मदत करणाऱ्या या अशा उत्साही वन्यजीवप्रेमींमुळे सुध्दा वाघाची राजकीय हत्या झाल्याची टीका आता सुरू झाली आहे.
दरम्यान, वाघाला सायंकाळी ६.३० वाजता गोळ्या घातल्यानंतर पोंभूर्णा गावात गर्दी होऊ नये म्हणून त्याला तातडीने रात्री ९.३० वाजता चंद्रपूरला रामबाग नर्सरीत आणण्यात आले. येथेही लोकांची गर्दी बघून लगेच मृतदेह फ्रिजरमध्ये ठेवण्यात आला. आज सकाळी रामबाग नर्सरीत शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कार करू, अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांना दिली. मात्र, माध्यमांची नजर चुकवून पहाटे पाच वाजता वाघाचा मृतदेह मोहुर्ली येथे नेऊन तेथे नर्सरीत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.चित्रा राऊत, डॉ.कडूकर, डॉ.खोब्रागडे, डॉ.चोणकर, डॉ.ठाणेकर यांच्या पथकाने शवविच्छेदन केले.
ए.के.४७ मधून गोळ्या घालण्यात आल्याने वाघाचे तोंड पूर्णत: फाटले होते, तसेच बरगडय़ाही तुटल्या होत्या. जवळपास पाच ते सहा गोळ्या आरपार निघून गेल्या. फक्त दोन गोल्या त्याच्या शरिरात सापडल्या. दोन तास शवविच्छेदन सुरू होते. त्यानंतर मोहुर्ली येथेच वाघाला जाळण्यात आले. यावेळी मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, अभय बडकेलवार, पवार यांच्यासह वनविकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बेशुद्ध करणे सहज शक्य होते
दरम्यान, वाघाला सहज बेशुध्द करता येऊ शकले असते, अशी माहिती घटनास्थळीच काही वन्यजीव प्रेमींनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दिली. वाघ नेमबाजांच्या अतिशय जवळ आलेला असतांनाही केवळ अनुभव नसल्यामुळे व प्रशिक्षित नेमबाज नसल्यामुळे बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन देण्यात अपयश आल्याची माहिती एका वन्यजीव अभ्यासकाने दिली, तसेच वाघाला बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन देण्यासाठी किमान दोन हत्तींना पाचारण करण्यात यावे, अशीही सूचना व विनंती वनखात्याकडे करण्यात आली होती, परंतु सर्जन भगत यांनी थेट गोळ्या घालण्याचेच आदेश दिल्याने व त्याला राजकारणी आणि काही उत्साही वन्यजीवप्रेमींची मदत मिळाल्यानेच ही क्रुर घटना घडली आहे. या संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी करावी, अशी मागणी समोर आली आहे, तर ग्रीन प्लॅनेट सोसायटी यासाठी न्यायालयात जाणार असल्याची माहिती दिली.