खिलारी गोधनाच्या खरेदी-विक्रीसाठी माणदेशात प्रसिध्द असलेल्या खरसुंडीच्या यात्रेत यंदा २ कोटींची उलाढाल झाली. चालू वर्षी यात्रेत २५ हजार जनावरांची आवक झाली असली तरी बलांच्या शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्याने खिलारी खोंडांची किंमत कमी झाली आहे.
    माणदेशातील माळरानावर तग धरून राहणारी आणि कष्टाला चांगली जात म्हणून खिलार प्रजात या भागात मोठय़ा प्रमाणात पदास केली जाते. अंगाने सडपातळ, पण कष्टाळू असल्याने शेतकरी वर्गाकडून खिलार खोंडांना चांगली मागणी असते. याशिवाय काल-परवापर्यंत शर्यतीसाठी म्हणून वापरली जाणारी खिलार खोंडे हुकमी मिळण्याचे ठिकाण म्हणून आटपाडी, कवठेमहांकाळ, जत या तालुक्यांबरोबरच सातारा जिल्ह्य़ातील खटाव, माण आणि सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, सांगोला तालुक्यात खरसुंडीच्या यात्रेतील जनावरांच्या बाजाराची ओळख होती. आजही चांगल्या प्रतीच्या खोंडासाठी याच यात्रेत जावे लागते.
    सिध्दनाथांची यात्रा झाल्यानंतर तब्बल दहा ते बारा दिवस येथे जनावरांचा बाजार भरतो. आटपाडी बाजार समितीने जनावरांच्या बाजारासाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून या वर्षी २५ हजार जनावरांची आवक झाली. यंदा खिलार खोंडाला जास्तीत जास्त ८० हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. आवक झालेल्या जनावरांपकी एक हजार जनावरांची विक्री झाल्याची नोंद बाजार समितीकडे करण्यात आली आहे. याशिवाय बाजार समितीकडे नोंद न करता परस्पर विक्री व्यवहारही झाले आहेत. यंदाच्या बाजारात सुमारे २ कोटींची उलाढाल झाली आहे.