आधार कार्डच्या धर्तीवर योजना

देशातील नागरिकांची ओळख निर्माण करणाऱ्या आधार कार्डप्रमाणेच आता दुग्धोत्पन्नातील जनावरांनाही ओळख क्रमांक मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात गायी, म्हशींना ही ओळख दिली जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय पशुधन विभागाने ‘इनाफ’ (इन्फर्मेशन नेटवर्क फॉर अ‍ॅनिमल प्रॉडक्टिव्हिटी अँड हेल्थ) ही संगणक प्रणाली विकसित केली आहे.

योजनेंतर्गत नगर जिल्हय़ातील ९ लाख २२ हजार गायी व १ लाख ५ हजार म्हशींना ओळख क्रमांक दिला जाणार आहे. त्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जात असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भरत राठोड यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. जिल्हय़ात १६ लाख ४८ हजार ५४८ जनावरे आहेत. दूध देणाऱ्या गायींची संख्या सुमारे साडेचार लाख आहे. प्रतिदिन सुमारे २७ लाख लि. दुग्धोत्पादन करून जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. गायी, म्हशींना दिला जाणारा हा १२ अंकी क्रमांक एकमेव (युनिक) असेल, तो दुसऱ्या गायी, म्हशींना दिला जाणार नाही. हा रबरी बिल्ला (टॅग) जनावरांच्या कानाला लावला जाईल. या क्रमांकासह पशुधन पर्यवेक्षक, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी जनावरांची नोंद, दवाखान्यात आल्यावर किंवा त्यांच्या भेटीच्या वेळी इनाफ या संगणक प्रणालीत करतील. विक्री झाल्यानंतर, अन्य कारणाने स्थलांतरित झाल्यानंतरही याच क्रमांकाच्या आधारे संबंधित ठिकाणच्या दवाखान्यात पुन:नोंदणीही होईल. जनावर दगावल्यावर मात्र हा क्रमांक काढून टाकला जाईल. बिल्ला हरवल्यास नवा क्रमांक दिला जाईल. जनावरांचे व्यवस्थापन व भविष्यातील नियोजनासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार असल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले.यासाठी पशुधन विकास अधिकारी (तांत्रिक) डॉ. राजेंद्र जाधव व डॉ. शशिकांत कारखिले, सहायक आयुक्त एम. डी. तांदळे यांना गुजरातमध्ये प्रशिक्षण देण्यात आले, ते तिघे जिल्हय़ात मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहात आहेत. जनावरांचे दवाखाने ऑनलाइन झाल्यानंतर ही प्रणाली सक्षमतेने वापरली जाईल. या संगणक प्रणालीचा वापर करण्यासाठी संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना लॅपटॉपही दिले जाणार आहेत.

प्रस्तावित १२ अंकी ओळख क्रमांकात गायी, म्हशींच्या वंशावळीसह तिची जात, वय, वेत, सद्य:स्थिती, आजार, मालकाचा नाव, पत्ता (आधार क्रमांकासह) अशी इत्थंभूत माहिती असेल.