प्लँचेटचे समर्थन करून या त्याद्वारे खुनाचा तपास करणे शक्य असल्याचे सिद्ध करून दाखविणाऱ्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे २१ लाख रुपयांचे बक्षिस दिले जाईल, असे आव्हान समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात पुणे पोलिसांकडून प्लँचेटचा वापर करण्याचा प्रयत्न झाला. या प्रयत्नांचे काही जणांनी समर्थन केले. डॉ. दाभोलकर यांनी संपूर्ण आयुष्य अंधश्रद्धा निर्मूलनासाठी खर्ची घातले. त्यांच्या खुनाच्या तपासासाठी त्यांचाच आत्मा बोलावून प्लँचेट करणाऱ्यांची मदत घेण्यात येणे हे निषेधार्ह असल्याने या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणीही समितीने केली आहे.
विज्ञानाचा वापर संपूर्ण मानवजातीकडून होत असताना सध्याच्या शतकात प्लँचेटचे समर्थन करणे खेदजनक आहे. त्यामुळे समितीतर्फे आव्हान देण्यात आल्याचे पाटील यांनी नमूद केले आहे. हे सिद्ध करणाऱ्यांना समितीकडून २१ लाखांचे बक्षिस देण्याचेही जाहीर करणात आले असल्याची माहिती माधव बागवे, सुशीला मुंडे आदी अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.