सवरेदय परिवाराकडून चार बसगाडय़ा सुपूर्त

राज्याच्या ग्रामीण भागात ग्राम सुरक्षा दले सक्रिय करून गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांना द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कोपर्डी येथे केली. त्यांच्यासह आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार व सवरेदय परिवाराचे प्रमुख भय्यूजी महाराज यांनी शुक्रवारी कोपर्डी येथे पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

कोपर्डी येथील विद्यार्थिनींना शेजारील कुळधरण या गावातील शाळेत जाण्या-येण्यासाठी सवरेदय परिवाराने चार अद्ययावत बसगाडय़ा दिल्या आहेत. या गाडय़ांचे लोकार्पण हजारे, पवार व भय्यूजी महाराज यांच्या हस्ते झाले. पीडित मुलीची आई व अन्य कुटुंबीयांकडे या गांडय़ांच्या चाव्या सुपूर्त करण्यात आल्या. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंजुषा गुंड, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, राजेंद्र गुंड, आदी या वेळी उपस्थित होते.

हजारे, पवार व भय्यूजी महाराज यांनी सुमारे तासभर पीडित कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यांचे सांत्वन करून या नराधमांना फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पीडित मुलीच्या आईने आता अन्य कोणा मुलीवर अशी वेळ येऊ नये, अशा भावना व्यक्त केल्यानंतर सर्वच निशब्द झाले. हजारे यांनी या वेळी या आरोपींना फाशीची शिक्षा होईपयर्ंत आपण संघर्ष करू, असा निर्धार व्यक्त केला.

सवरेदय परिवाराने विद्यार्थिनींसाठी दिलेल्या बासगाडय़ांचा सर्व खर्च संस्थाच करणार आहे. मात्र, या व्यावस्थापनासाठी जबाबदारी पीडित मुलीच्या आईच्या अध्यक्षतेखाली स्थनिक समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीत स्थानिक सहा महिला व पाच पुरूषांचा समावेश आहे. या गाडय़ांमध्ये  सीसीटीव्ही, व्हिडीओ रेकॉर्डर, जीपीएस यंत्रणा असा आधुनिक सुविधाही कार्यान्वीत करण्यात आल्या आहेत. या गाडय़ांच्या चालक व वाहक महिलाच असतील.