राष्ट्रवादी काँग्रेसची वरमाईच शिंदाळ झाली तर कलवऱ्यांचे काय होणार, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शरद पवारांवर खरमरीत टीका केली. ज्यांना पहिल्यापासून भ्रष्ट लोकांना सांभाळायची सवय लागली ते काय भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणार, असा सवालही त्यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना केला.
राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यावर आक्षेप घेत हजारे म्हणाले, पक्ष व पाटर्य़ा जाहीरनाम्याप्रमाणे वागतात का हा खरा प्रश्न आहे. १९९२ मध्ये भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे देऊनही त्या वेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी एकाही प्रकरणात काहीही कारवाई केली नाही. त्यामुळेच मी पद्मश्री पुरस्कार राष्ट्रपतींकडे परत केला होता. आजही त्यांच्या पक्षातील लोकांवर असंख्य आरोप आहेत. पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात पुरावे देऊनही ते आता पुन्हा पुरावे मागत आहेत. न्यायमूर्ती पी. बी. सावंत आयोगाच्या फाइलमध्ये पुरावे आहेत. मंत्रालयातील ही फाइल कोणी दाबली, या अहवालावर कारवाई का झाली नाही, असे सवाल करून या कारवाईबाबत मी अनेकदा पत्रव्यवहार केला, परंतु शरदराव त्यावर काहीही न बोलता मूग गिळून गप्प आहेत असे ते म्हणाले.
एकीकडे भ्रष्ट लोकांना उमेदवाऱ्या द्यायच्या व दुसरीकडे भ्रष्टाचारमुक्त शासनाचा जाहीरनामा काढायचा, त्यातून काय निष्पन्न होणार, असा सवाल हजारे यांनी केला. गेल्या दीड वर्षांपासून तुरुंगात असलेले सुरेश जैन तुरुंगात जाण्यापूर्वी ते राष्ट्रवादीच होते. याच शरदरावांनी त्यांना पोसले. वरमाई शिंदाळ झाली तर कलवऱ्यांचे काय होणार, असा सवाल करून हे लोक जनतेची दिशाभूल करीत आहेत. त्यांच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत, मी काही बोलत नाही. शिवाय माझ्यावरच अब्रूनुकसान भरपाईचा दावा दाखल करण्याची भाषा केली जात असेल तर एकेका मंत्र्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढीन, असा सज्जड इशाराही हजारे यांनी दिला. अशा लोकांनीच हा देश बुडवल्याचा आरोप करून हा देश कोणाची वडिलोपार्जित संपत्ती नाही. देश वाचवण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावेच लागतील असेही त्यांनी ठणकावून सांगितले.