महिलांवरील अत्याचाराविरोधात कठोर कायदे करण्यासाठी सरकारला सुबुद्धी सुचावी यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरूवारी सकाळपासून राळेगणसिद्घीत संत यादवबाबा मंदिरात ग्रामस्थांसह प्रार्थनेस प्रारंभ केला. उद्या (शुक्रवार) सायंकाळपर्यंत ते मंदिरातच प्रार्थना करणार आहेत.
सकाळी हजारे यांच्या उपस्थितीत व व्दारकानाथ दंडवते यांच्या हस्ते वेदमंत्रोपचारात संत यादवबाबांच्या समाधीस अभिषेक करण्यात येऊन सरकारला कठोर कायदे करण्यासाठी सुबुद्घी सुचावी यासाठी प्रार्थना करण्यात आली.
देशात न्यायव्यवस्था सर्वोच्च असून देशातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चांगले कायदे तयार करण्यासाठी जनतेने विधानसभा व लोकसभेत सदस्य निवडून पाठविले आहेत. सर्व मंत्री जनतेचे सेवक असून जनहिताचे निर्णय घेणे हे त्यांचे कर्तव्य आहे. दिल्लीतील घटनेमुळे देशातील जनतेचा राग उफाळून आला. त्याची दखल घेऊन सरकारने कठोर कायदे करण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत. आजवर अशा प्रकारचे कायदे न झाल्यानेच दिल्लीसारखे कृत्य करण्यासाठी ते नराधम धजावले असल्याचे हजारे यांनी नमूद केले. यापुढील काळात असे कृत्य करू नये यासाठी लवकरात लवकर महिलांवरील अत्याचाराविरोधात कठोर कायदा संमत झाला पाहिजे, त्यासाठीच आम्ही यादवबाबांना साकडे घातले असल्याचे, ते म्हणाले. देशातील जनता या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरली असून सरकाने त्यांच्या भावना समजावून घेणे गरजेचे असताना जमावबंदीचा आदेश लागू करून जनतेचा आवाज दाबणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचाच प्रकार आहे. जनतेला घटनेनेच शांततापूर्ण मार्गाने आंदोलने करण्याचा अधिकार दिला आहे. तो सरकार हिरावून घेऊ शकत नाही. जनतेच्या आंदोलनास विरोध करण्यापेक्षा सक्षम कायदे करून जनतेला दिलासा देण्याची गरज असल्याचे, हजारे म्हणाले.
जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबासाहेब तांबे, सरपंच जयसिंग मापारी, उपसरपंच संपत उगले, माजी सरपंच गणपतराव मापारी, भामाबाई फटांगडे यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.