अण्णा हजारे उद्या दिल्लीत आंदोलन करणार

लोकपाल विधेयकाची अंमलबजावणी करण्याऐवजी लोकपाल कायदा कमकुवत करण्याचे प्रयत्न मोदी सरकारकडून होत असल्याचा आरोप करतानाच लोकपाल कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या मागणीसाठी सोमवारी, २ ऑक्टोबरला दिल्ली येथे राजघाटावर आंदोलन करण्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज, शनिवारी राळेगणसिद्धीत बोलताना जाहीर केले.

राळेगणसिद्धीच्या (ता. पारनेर) पद्मावती मंदीरातील नवरात्रोत्सवाची सांगता हभप बाळकृष्ण महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. त्यावेळी हजारे यांनी पंचक्रोशीतील नागरीकांशी संवाद साधला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, उद्योजक भगवान पठारे, सुरेश पठारे, सुभाष पठारे, शंकर नगरे, दादा पठारे, राळेगणसिद्धीच्या सरपंच रोहीणी गाजरे आदी उपस्थित होते.

हजारे म्हणाले, जनतेला सरकार दरबारी कामे मार्गी लावताना अधिकारी, कर्मचाऱ्यांचे हात ओले करावे लागतात. सरकारी कामे पुर्ण करण्यासाठी विलंब होतो व त्यातूनच भ्रष्टाचार बोकाळतो. हे टाळण्यासाठी, सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकपालाच्या कक्षेत आणणे गरजेचे आहे, तसे झाले तर भ्रष्टाचारास आळा बसू शकेल. मात्र मोदी सरकारने सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांना लोकपालाच्या कक्षेतून वगळले आहे. लोकपाल कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी आपण गेल्या  तिन वर्षांपासून पंतप्रधानांकडे सातत्याने करीत आहोत. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. तर दुसरीकडे या कायद्यातील दुरूस्तीचे विधेयक अवघ्या तिन दिवसांत मंजुर करून घेतले जाते, हा विरोधाभास आहे.

आंदोलनाची रुपरेषा

महात्मा गांधींच्या जयंतीदिनी, २ ऑक्टोबरला दिल्लीत येथे राजघाटावर म. गांधींच्या समाधीस्थळी हजारे हे चिंतन करणार आहेत. त्याच दिवशी आंदोनाची तारीख व रूपरेषा ते जाहीर करणार आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी मोदी यांना पाठविलेल्या पत्रात येत्या तिन महिन्यात लोकपाल विधेयकाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी हजारे यांनी केली आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनानंतर नविन वर्षांच्या सुरूवातीला जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडयात हजारे यांचे आदोलन सुरू होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

माझी काळजी करु नका..

आपण समाजसेवेची सुरूवात राळेगणसिद्धीपासून केली. सुरूवातीस गाव त्यानंतर राज्य व आता देशासाठी आपण जिवन समर्पित केले आहे. देशातील सर्वसामान्य जनतेसाठी आपण लढा देत आहोत. त्यामुळे आपल्या आंदोलनामुळे राळेगणसिद्धी परिवारातील लोकांनी व्यथित होउ नये, दु:खी होउ नये, माइया प्रकृतीची काळजी करू नये, असे भावनिक आवाहन हजारे यांनी यावेळी केले.