माजी सैनिकांच्या ‘वन रँक वन पेन्शन’ लढ्यामध्ये आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीसुद्धा उडी घेतली असून, या मागणीसाठी ते दोन ऑक्टोबरपासून दिल्लीत बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. अण्णा हजारे यांनीच बुधवारी राळेगणमध्ये पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. वन रँक, वन पेन्शन योजनेची अंमलबजावणी करावी, यासाठी काही दिवसांपूर्वीच अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले होते. त्यानंतर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. अण्णा हजारे हे सुद्धा स्वतः माजी सैनिक आहेत.
बेमुदत उपोषण सुरू करण्यापूर्वी प्रत्येक राज्यामध्ये दोन सभा घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. या सभांमधून माजी सैनिकांचे प्रश्न, शेतकऱय़ांचे प्रश्न आणि प्रस्तावित भूमी अधिग्रहण विधेयकातील तरतुदींनाही विरोध करण्यात येणार आहे. बेमुदत उपोषण दिल्लीत कुठे करायचे, हे अद्याप निश्चित झालेले नाही.
येत्या २६ जुलैला कारगिल विजय दिनानिमित्त राळेगणमध्ये शहीद पत्नींचा सन्मानही करण्यात येणार असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले.