ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना वारंवार येत असलेल्या धमक्यांच्या पाश्र्वभूमीवर सरकारने त्यांना देऊ केलेली ‘झेड प्लस’ सुरक्षा स्वीकारावी, यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी शनिवारी राळेगणसिद्घी येथे हजारे यांची भेट घेतली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर झालेले संभाषण तसेच विखे व आमदार विजय औटी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हजारे यांनी ‘झेड प्लस’ सुरक्षा स्वीकारण्यास तयारी दर्शविली आहे. हजारे यांचे वास्तव्य असलेला यादवबाबा मंदिर परिसर व त्यांच्या कार्यालयाचीही दररोज धातुशोधक यंत्र, श्वानाच्या मदतीने तपासणी करण्यात येत आहे.