रायगड लोकसभा मतदारसंघासाठी शेकापने रमेश कदम यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. मात्र रमेश कदम यांच्या प्रचाराची सर्व धुरा बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या पाठिंब्यावर असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते. शेकापच्या प्रचारसभा, बॅनर्स, प्रचार साहित्यावर अंतुले यांचे फोटो झळकताना दिसतात. एवढेच नव्हे तर रमेश कदम यांना मत द्या असे आवाहन करणारे अंतुले यांचे स्वहस्ताक्षरातील पत्र शेकापने जारी केले आहे.  
बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या हस्ताक्षरातील मराठी आणि उर्दू भाषेतील पत्र शेकापकडून जारी करण्यात आले आहे. २४ तारखेला होणाऱ्या निवडणूकीत सुनील तटकरे पराभूत होतील याची खबरदारी घेण्याचे आवाहन अंतुले यांनी या पत्राच्या माध्यमातून केले आहे. तटकरे यांच्या वडिलांचे निधन झाले होते, त्यावेळी त्यांची संपत्त्ती किती होती आणि आज त्यांची संपत्ती किती आहे? ही संपत्ती आली कुठून? माझा फायदा आणि गैरफायदा घेऊन नंतर पाठीत खंजीर खुपसणाऱ्या तटकरेंना दिल्लीत पाठवणार का? असा सवाल त्यांनी या पत्रात केला आहे. भ्रष्टाचारामुळे रायगडचे मत बदनाम करू नका. आपले मत रमेश कदम यांना द्या, असे आवहन अंतुले यांनी या पत्रातून केले आहे.
अंतुले यांच्या सविस्तर मुलाखतीची सीडी शेकापने तयार केली आहे. गावागावात जाऊन, प्रचार सभांमधून ही सीडी दाखवली जाते. या मुलाखतींमधून अंतुले हे सुनील तटकरे, शरद पवार आणि सोनिया गांधींविरोधात उघड उघड टीका करत असल्याचे दिसून येते. रायगड जिल्ह्य़ात अंतुले यांना मानणारा मोठा गट आहे. त्याचबरोबर मुस्लीम समाजातही त्यांना मानाचे स्थान आहे. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेचा आणि तटकरेंवर असलेल्या नाराजीचा फायदा घेण्याचे प्रयत्न शेकापने सुरू केले असल्याचे दिसून येत आहे. अंतुले यांच्या स्वहस्ताक्षरातील हे पत्र घरोघरी पोहचवण्याचे प्रयत्न आता शेकापकडून केले जाणार आहेत.
   अलिबाग येथील पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या संकुलात आयोजित पत्रकार परिषदेत शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी या पत्राचा खुलासा केला आहे. अंतुले यांच्या पाठिंब्यामुळे शेकापची ताकद वाढली असून त्यांच्या पाठिंब्यामुळे शेकापला ४० ते ५० हजार मते मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. अंतुले यांचा पाठिंबा नसता तर शेकापला ही निवडणूक कदाचित कठीण गेली असती असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.