साता-यातील ढिसाळ शासकीय कारभाराबाबत आम आदमी पक्षाने थेट शिवरायांनाच निवेदन दिले आहे. त्यात, आम्ही दिवस ढकलत जगत आहोत, अशी कैफियत मांडली आहे.
सातारा येथील नागरिकांना अनेक वर्षांपासून मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. पिण्यासाठी स्वच्छ पाणी, दर्जेदार व प्रशस्त रस्ते, पुरेशी पाìकग व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृहे, शौचालय, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्र, बाजारपेठा इत्यादीचा अभाव या ऐतिहासिक नगरीला आहे. असे असतानाही आम्ही दिवस ढकलत जगत आहोत, असे निवेदनात म्हटले आहे.
शिवरायांना हे निवेदन देण्यासाठी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राजवाडा ते पोवईनाका असा मोर्चा काढला. निवेदनात पुढे म्हटले आहे, की आजची परिस्थिती अतिशय गंभीर असून त्यात सुधारणा होण्यासाठी प्रशासकीय कार्यकर्त्यांना लेखी आणि तोंड सूचना दिल्या. परंतु निर्ढावलेल्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात काहीच फरक पडला नाही. जे सरकार तुमच्या नावाचे भांडवल करते, निवडून येण्यासाठी तुमचे नाव वापरते त्यांना आपण निर्माण केलेले सुराज्य, कायदे प्रशासन व लोकहितार्थ व कल्याणकारी चालवण्याची सुबुद्धी यावी, अशी प्रार्थना या निवेदनात केली आहे. निवेदनावर धनंजय शिंदे, संतोष शेंडे, हरिदास साळुंखे, संतोष पवार यांच्या स्वाक्ष-या आहेत.