सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर जिल्ह्य़ातील तब्बल २ हजार ५९७ कार्यकर्ते, पदाधिका-यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. त्यांची नावे नुकतीच राजपत्रात सामान्य प्रशासन मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहेत. त्यामुळे आता या पदावर ३ हजार ३२९ जण कार्यरत आहेत.
तालुकानिहाय विशेष कार्यकारी अधिका-यांची संख्या पुढीलप्रमाणे- नगर शहर ३१२, नगर तालुका १३४, संगमनेर ११५, राहाता १५९, पारनेर १४८, राहुरी १३३, नेवासे ३१३, श्रीगोंदे १३८, कर्जत व जामखेड-३४८, श्रीरामपूर ३२२, शेवगाव व पाथर्डी- २७४, अकोले ३०१. जिल्हा प्रशासनाने ही यादी तहसील कार्यालयास पाठवली आहे. ही नियुक्ती पाच वर्षांसाठी आहे. तहसीलदारांमार्फत त्यांना प्रमाणपत्र, ओळखपत्र व शिक्के दिले जाणार आहेत.
तालुक्यात ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ६० टक्के व मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांना ४० टक्के स्थान असा निकष पालकमंत्र्यांनी लावला आहे. ज्या ठिकाणी दोन्ही पक्षांचा आमदार नाही तेथे काँग्रेस व राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांना ५०-५० टक्के स्थान देण्यात आले आहे. गेल्या जानेवारी २०१३ मध्ये ७३२ जणांची यादी जाहीर झाली होती, परंतु राज्य सरकारने या पदावरील नियुक्तीसाठी १२ उत्तीर्णची अट लागू केल्याने पुन्हा यादी तयार करणे, त्यासाठी पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी अहवाल मागवणे, मंत्रालय व पालकमंत्र्यांची मान्यता घेणे असे सोपस्कार पार पाडावे लागले.
आघाडी सरकारच्या गेल्या कार्यकाळात या नियुक्त्या झाल्याच नव्हत्या. सध्याचा कार्यकाळ संपता, संपता या नियुक्त्या झाल्याने कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.