म्हसळा तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अली कौचाली यांच्या घरावर अज्ञात इसमांनी सशस्त्र हल्ला चढवला. यात कौचाली यांचा मुलगा जखमी झाला. या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
म्हसळा तालुक्यातील पांगळोली गावात गुरुवारी रात्री ही घटना घडली. चार जण दीडच्या सुमारास संशयास्पदरीत्या कौचाली यांच्या घरात घुसले. चोरीच्या उद्देशाने हे चौघे घरात घुसले असावेत असा संशय व्यक्त केला जातो. दरम्यान घरात कोणी तरी घुसल्याचे हशीम कौचाली आणि अबुबकर कौचाली यांच्या हे लक्षात आले.
या दोन्ही भावांनी चार जणांचा प्रखर विरोध केला. या वेळी झालेल्या झटापटीत हशीम कौचाली यांच्यावर सशस्त्र हल्ला चढवण्यात आला. चाकूने वार करून हल्लेखोर पळून गेले.
दरम्यान जखमी झालेल्या हशीम कौचाली यांना उपचारासाठी म्हसळा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून साहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड अधिक तपास करत आहेत.