‘रयत’चे अध्यक्ष शरद पवार यांची घोषणा

नगर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयात मुलींना लष्करात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबरोबरच तत्काळ नोकरीची हमी देणारा ‘हॉस्पिटॅलीटी’ अभ्यासक्रम सुरू केला जाईल, मात्र त्यासाठी देशात कोठेही काम करण्याची तयारी ठेवा, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३० वी जयंती कार्यक्रम, महाविद्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे व प्रयोगशाळेचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील होते. विरोधी पक्षनेते राधाकृ ष्ण विखे, माजी आमदार अशोक काळे, आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, श्रीमती मीना जगधने, संस्थेचे सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे, उपाध्यक्ष अरुण कडू, माजी आमदार दादा कळमकर, माजी मंत्री बबनराव पाचपुते, युवा नेते आशुतोष काळे आदी उपस्थित होते. यावेळी शहरातील बुरुडगाव रस्त्यावरील संस्थेच्या उत्तर विभागाच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटनही पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

कर्मवीर व त्यांच्या कार्यासाठी नगर जिल्ह्य़ातील अनेकांनी मोठे सहकार्य केले, त्यामुळे रयत व नगरचे वेगळे ॠणानुबंध निर्माण झाले, स्व. शंकरराव काळे यांनी संस्थेला वेगळी दिशाही दिली याचा उल्लेख करून शरद पवार म्हणाले की, रयत संस्थेने आता चाकोरीबाहेरील शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे, त्यासाठी नवे उपक्रम राबवताना कौशल्य विकासावर भर दिला जाणार आहे, हाच विचार कर्मवीरांनी कौशल्य विकासातूनच कर्तृत्व निर्माण करण्यावर व ते रुजवण्याचे काम केले, तोच विचार आताही रुजवला जात आहे, कौशल्य विकास अभ्यासक्रमांसाठी पुण्यातील सिंम्बॉयसिस संस्थेने विद्यापीठ स्थापन केले, त्याचे अभ्यासक्रम नगरमध्ये राबवले जातील.पारंपरिक शिक्षण पद्धती सोडून कौशल्यावर आधारित समृद्धी निर्माण करणारे अभ्यासक्रम सुरू करण्याचे बदल शिक्षण संस्थांनी स्वीकारले पाहिजेत, असे बदल रयत संस्थेत होताना दिसत आहेत, असे विरोधी पक्षनेते विखे म्हणाले. डॉ. अनिल पाटील यांनी भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. स्वागत करताना आशुतोष काळे यांनी कनिष्ठ महाविद्यालयासाठी स्वतंत्र इमारत उभी करण्याची जबाबदारी स्वीकारली. प्राचार्य दीनानाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले. माधवी लगड या विद्यार्थिने मनोगत व्यक्त केले. गुणवंत कर्मचारी प्रा. डॉ. संजय नगरकर, प्रा. हेमंत गोखले, प्रा. सचिन कोतकर, गुणवंत खेळाडू तेजस्विनी बनसोडे व श्रद्धा वामन यांचा गौरव करण्यात आला.