दीपावली
अभिजात चित्रकलेचा ध्यास घेतलेले अवलिया चित्रकार दीनानाथ दलाल यांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू आहे. याचे औचित्य साधत या अंकात सुहास बहुळकर यांचा ‘जन्मशताब्दी चित्रकाराची, दीनानाथ दलाल यांची’ हा विस्तृत लेख घेण्यात आला आहे. दलालांचे वैयक्तिक जीवन तसेच त्यांचा कलाप्रवास याचे तपशीलवार वर्णन या लेखात वाचण्यास मिळते. या अंकाचे मुखपृष्ठ हे दलालांनीच रेखाटलेले प्रसिद्ध चित्र आहे, तर समकालीन लेखकांना त्यांच्या पुस्तकांसाठी दलालांनी चितारलेलेच चित्र हवे असे, हे अधोरेखित करण्यासाठी त्या काळातील अनेक गाजलेल्या पुस्तकांची मुखपृष्ठे लेखासोबत पाहता येतात. भारत सासणे, अरुण साधू, अशोक राणे, गणेश मतकरी यांच्या कथा वाचनीय आहेत. धर्माधता वाढली आहे का? या शीर्षकांतर्गत असलेल्या लेखमालेत दत्तप्रसाद दाभोळकर, अब्दुल कादर मुकादम, दा. कृ. सोमण, फ्रान्सिस दिब्रिटो, डॉ. सच्चिदानंद शेवडे आणि प्रेमानंद गज्वी यांनी विचार मांडले आहेत.
संपादक – अशोक कोठावळे, पाने- २५६, किंमत-१५० रु.

धर्मभास्कर
वैचारिक खाद्य पुरविणाऱ्या धर्मभास्करचे हे ४५वे वर्ष. विद्यावाचस्पती गुरुदेव शंकर अभ्यंकर यांनी लिहिलेला लोकमान्य टिळकांचे ‘गीतारहस्य’ हा या अंकातील प्रमुख लेख असून प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर यांनी त्यास साजेसे मुखपृष्ठ चितारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्यलडचा दौरा केल्याने उभय देशांतील संबंध दृढ झाले, असे वृत्तान्त सर्वत्र प्रसिद्ध झाले, मात्र आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात क्रांतिकारकांसाठी आर्यलड व इटली हे देश प्रेरणादायी होते व त्यामुळेच भारत व आर्यलडदरम्यान कसे सौहार्दाचे संबंध होते, याचे विवेचन ज. द. जोगळेकर यांनी केले आहे. मोदींच्याच अनेक विदेश दौऱ्यामागील राजकारण डॉ. मोडक यांच्या लेखात वाचण्यास मिळते.
संपादक – ॠतावरी अवधूतशास्त्री तुळापूरकर, पाने- २५२, किंमत-८० रु.

अक्षर

अक्षर दिवाळी अंक हा नेहमीच विविध प्रकारच्या लालित्यपूर्ण वाचनीय साहित्याची रेलचेल असणारा अंक म्हणून नावाजला जातो. यावेळी पर्यटनाच्या पलीकडेही बरेच काही अनुभवण्यासारखे असते, या संदर्भातील विशेष लेखांनी अंकातील साहित्याला वेगळेपण प्राप्त झाले आहे. प्रसाद देशपांडे, डॉ. शुभा चिपळूणकर, सुबोध जठार यांचे पर्यटनाविषयीचे लेख वाचनीय झाले आहेत. सतीश तांबे, गणेश मतकरी, रुपाली जगदाळे यांच्या कथा तर हेमंत देसाई, अतुल देऊळगावकर, निळू दामले, इरावती कर्णिक, दीप्ती राऊत, अच्युत गोडबोले, श्रीरंजन आवटे, लक्ष्मण लोंढे यांचे वैचारिक लेख वाचनीय झाले आहेत. संपादक : मीना कर्णिक, हेमंत कर्णिक , पाने : २७४; किंमत १६०