कवी मंगेश पाडगावकर यांनी कधीच देवासाठी लिहिले नाही. त्यांनी माणसांसाठी लिहिले. त्यामुळे त्यांच्या कवीत माणसाच्या थेट हृदयाला जाऊन भिडतात, असे प्रतिपादन कवी अरुण म्हात्रे यांनी केले.
रायगड जिल्हा ग्रंथालय संघ, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मराठी भाषा विभाग, साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवातील काव्यमफल या कार्यक्रमात अरुण म्हात्रे बोलत होते. या कार्यक्रमात अरुण म्हात्रे यांनी मंगेश पाडगावकरांच्या काही गाजलेल्या कविता व गाणी सादर केली. आपल्या आसपासचा परिसर कितीही सुंदर असला तरी त्याला शब्दबद्ध करता आला पाहिजे. ती ताकद कवीमध्ये असली पाहिजे. त्यासाठी रियाज असावा लागतो, शब्द जमवावे लागतात, असे कवी अरुण म्हात्रे म्हणाले. अरुण म्हात्रे यांनी मंगेश पाडगावकरांची, ‘सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी’, भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘दिवस तुझे हे फुलायचे झोपळ्यावाचून झुलायचे’, ‘अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती’ आदी गाणी सादर केली. अरुण म्हात्रे यांनी सादर केलेले व स्वत: लिहिलेले ‘उंच माझा झोका गं’ या मालिकेचे शीर्षकगीत व महेश केळूसकरांची ‘झिनझिनाट’ ही कविता प्रेक्षकांची दाद मिळवून गेली. सौ. सुजाता पाटील यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.