काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा विश्वास

शंकररावांवरील भक्ती, आमची युक्ती अन् नांदेड जिल्ह्यात काँग्रेसची राजकीय शक्ती या त्रिसूत्रीच्या बळावर नांदेड मनपाच्या आगामी निवडणुकीत पक्षाची सत्ता कायम राखण्याचा मनोदय प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या मर्यादा उघड करत त्यांनी कोणालाही प्रभारी केले तरी आम्ही त्यांना भारी ठरू, असा विश्वासही चव्हाण यांनी स्पष्ट केला.

येथील प्रगती महिला मंडळाच्या सभागृहात जिल्हा व शहर पदाधिकारी निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी आयोजित केलेल्या बठकीत खासदार चव्हाण बोलत होते. या वेळी पक्षाचे जिल्हा निवडणूक अधिकारी शकील अख्तर, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोिवदराव शिंदे नागेलीकर, प्रदेश सरचिटणीस बी. आर. कदम, आमदार डी. पी. सावंत, आमदार वसंतराव चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकत्रे उपस्थित होते.

निवडणूक अधिकारी शकील अख्तर यांनी महाराष्ट्रातील सर्व काँग्रेसजन प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यासोबत असल्याचे चित्र दिसून आल्याचे नमूद करीत प्रदेशाध्यक्षांच्या कामाला प्रशस्ती बहाल केली. त्यानंतर खासदार अशोक चव्हाण यांनी या जिल्ह्याची शंकरराव चव्हाणांवर भक्ती असल्याचे सांगत बहुसंख्य संस्था काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असल्याचे नमूद केले.

विरोधी पक्षांकडे विशेषत: भाजपकडे जिल्ह्यात सक्षम नेतृत्व नसल्यामुळे त्यांना बाहेरून प्रभारी आणावे लागत आहेत, पण काँग्रेस पक्षाची टीम भारी असल्यामुळे येणाऱ्या मनपा निवडणुकीत नांदेडचे मतदार या विरोधकांना त्यांची जागा दाखवून देतील, असा विश्वास खासदार चव्हाण यांनी व्यक्त केला. या वेळी पक्षाचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतुका पांडागळे यांनी केले.

काम एकाचे, श्रेय दुसऱ्याला !

काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणीच्या कार्यक्रमात नांदेड जिल्हा अव्वल असल्याचा ढोल जिल्हाध्यक्ष नागेलीकर वाजवत आहेत, परंतु ही सभासद नोंदणी बी. आर. कदम पक्षाचे जिल्हाध्यक्ष असतानाच्या काळातच झाली होती, अशी माहिती आता समोर आली आहे. कदम यांनी केलेल्या संघटनात्मक कामाचे श्रेय नागेलीकर यांना मिळाले, अशी चर्चा पक्षामध्ये होत आहे. या माहितीला काही तालुकाध्यक्षांनी दुजोराही दिला.