लैगिंक शोषणाच्या आरोपावरून काही महिन्यांपासून कारागृहात असलेले आसारामबापू यांचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून तर केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय रस्ते व जलवाहतूक मंत्र्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यापर्यंतच्या दिग्गज नेत्यांशी पूर्वी कसे जिव्हाळ्याचे संबंध होते, यासंदर्भात आसारामजी आश्रमाने आपल्या ‘ऋषी प्रसाद’ मासिकाच्या जूनमध्ये प्रकाशित अंकात प्रकाशझोत टाकला आहे. केंद्रातील सत्तांतरानंतर आपली तुरुंगातून सुटका होईल, या आशेवर असणाऱ्या बापुंसाठी आश्रमाने शोधलेली ही युक्ती म्हणजे दबावतंत्राचा भाग असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसारामबापूविरुध्द राजस्थानमधील जोधपूर तसेच सूरत येथे बलात्कार प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही प्रकरणात जामीन मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस आघाडी सरकारने या गुन्ह्यांमध्ये आपल्याला गोवल्याचे बापू प्रसारमाध्यमांसमोर सांगत असत. जवळपास सात ते आठ महिन्यांपासून त्यांना उपरोक्त प्रकरणात जामीन मिळालेला नाही. केंद्रात सत्ता बदल झाल्यामुळे बापुंची सुटका होईल, अशी अपेक्षा त्यांचे भक्तगण बाळगून आहेत. त्या अनुषंगाने बापुंच्या आश्रमाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. आश्रमातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘ऋषी प्रसाद’ मासिकात बापुंसमोर यापूर्वी वेगवेगळ्या कार्यक्रमांत नतमस्तक होणाऱ्या दिग्गज नेत्यांची छायाचित्रे प्रसिध्द करणे हा त्याचाच एक भाग ठरू शकेल. काही वर्षांपूर्वी मोदी यांनी बापुंची भेट घेतली होती. मासिकाच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बापुंसमोर नतमस्तक झाल्याचे तेव्हाचे छायाचित्र वापरण्यात आले आहे. त्याखाली काही वर्षांपूर्वी बापुजींनी नरेंद्रभाईंना पंतप्रधान पदासाठी शुभाशीर्वाद दिल्याचे म्हटले आहे. बापुंचा आशीर्वाद फळाला आल्याचेही आश्रमाने म्हटले आहे. यासोबत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान पंतप्रधान मोदी यांनी बापुंप्रती तेव्हा व्यक्त केलेल्या भावनाही ठळकपणे अधोरेखीत करण्यात आल्या आहेत.
मासिकाच्या मुखपृष्ठावर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, विद्यमान गृहमंत्री राजनाथ सिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, केंद्रीय रस्ते व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाण, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे, गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी बापुंच्या दर्शनासाठी दरबारात लावलेल्या हजेरीच्या छायाचित्रांना जागा दिली गेली आहे. उपरोक्त नेत्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बापुंप्रती व्यक्त केलेल्या भावना आतील पानात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. मासिकात ज्या पानावर मोदी यांच्या भावना सविस्तरपणे नमूद आहेत, त्याच्या अगदी डाव्या बाजूच्या पानावर बापुजींवर लावलेले सर्व आरोप निराधार असल्याचे संत समाजाचे म्हणणे असल्याच्या विषयाला स्थान देण्यात आले आहे. याच अंकात ‘संतांना बदनाम करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे’ या मथळ्याखाली साधु-महंतांच्या प्रतिक्रियांना जागा देण्यात आली आहे. बापुंना लैिगक शोषणाच्या आरोपावरून अटक झाल्यानंतर या मासिकाच्या स्वरुपात असे अनेक बदल झाल्याचे निरीक्षण वाचकांनी नोंदविले आहे. जूनच्या अंकात प्रसिध्द झालेली छायाचित्रे हा त्याच बदलाचा भाग असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.