सत्ता बदलाची चाहूल लागल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य, अपक्ष अशा विविध पक्षातील अनेक मातब्बर इच्छुकांनी गुरुवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीसाठी रांग लावली होती.
काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडीक यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य अमल महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र सत्यशील माने, राष्ट्रवादीचेच दिवंगत नेते दिग्विजय खानविलकर यांचे सुपुत्र विश्वविजय खानविलकर, गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष राधानगरी तालुक्यातील काँग्रेसचे नेते अरुण डोंगळे, टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे महापालिकेतील स्वीकृत सदस्य प्रा. जयंत पाटील, वन महामंडळाचे संचालक व काँग्रेस पक्षाकडून पदवीधर मतदारसंघाची निवडणूक दोनदा लढविलेले उमेदवार माणिक पाटील-चुयेकर अशी भली मोठी यादी भाजपात प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसून आल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या. शहा यांनी थेट कोणालाही उमेदवारी देण्याचा शब्द दिला नसला तरी यातील अनेक जण संभाव्य शासन भाजपाच्या नेतृत्वाखाली येण्याचा कयास बांधून आतापासूनच राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांच्या संपर्कात राहण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी करवीरनिवासिनी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्याच्या हेतूने अमित शहा गुरुवारी करवीरनगरीत तीन तासांच्या दौऱ्यासाठी आले होते. त्यांच्या दौऱ्यापूर्वीच भाजपात प्रवेश करणाऱ्यांच्या मातब्बरांच्या नावावरुन चच्रेचा फड रंगला होता. त्याची प्रचिती प्रत्यक्ष दौऱ्यावेळी आली. शहा यांचे विमानतळावर आगमन झाले तेव्हा जिल्ह्यातील स्थानिक नेतृत्वाबरोबरच भाजपात प्रवेश करणाऱ्या इच्छुकांची रीघही तेथे लागली होती. यानंतर उपरोक्त इच्छुकांनी विमानतळाजवळच असलेल्या पटांगणात झालेल्या छोटेखानी सभेला उपस्थिती लावली. विशेष म्हणजे या इच्छुकांच्यात पहिल्या रांगेत बसून शहा यांच्या नजरेत आपली प्रतिमा उमटली जावी यासाठी आटापिटा सुरु असल्याचेही दिसत होते. सभा संपल्यानंतर शहा यांना भेटण्यासाठी इच्छुकांची तारांबळ उडाली होती. कमी वेळ असताना आणि गर्दी लोटली असतानाही शहा यांनी इच्छुकांशी हस्तांदोलन करुन अल्पसा संवाद साधीत त्यांना आपल्या परीने आश्वस्त केले. साक्षात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याशी संवाद साधल्याचा आनंद तमाम इच्छुकांच्या चेहऱ्यावर तरळत होता.
अमित शहा यांनी कोल्हापूरशी असलेल्या आपल्या नात्याला उजाळा दिला. सासुरवाडीत आपण यापूर्वीही येऊन गेल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख करतानाच महालक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्यासाठी उल्लेखनीय असल्याचे सांगितले. सभेनंतर ते थेट महालक्ष्मी मंदिरात पोहोचले. तेथे त्यांनी सपत्नीक अभिषेक केला. विधानसभा निवडणुकीत भाजपाला धवल यश मिळू दे असे साकडे त्यांनी घातले.
शहा यांच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत विमानातून आलेले प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्यासह खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, भाजपाच्या उपाध्यक्षा नीता केळकर, शहराध्यक्ष महेश जाधव आदी होते. काश्मीरमधील पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी प्रगती पतसंस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ पटेल व सहकाऱ्यांनी एक लाख अकरा हजार रुपयांचा धनादेश शहा यांच्याकडे सुपूर्द केला.