पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबाच्या हत्याकांडाच्या पार्श्र्वभूमीवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या आढावा घेऊन त्यात बदल करण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. याबाबत आपण राज्यपालांना भेटून त्यांच्याकडे ही मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या घटनेची सीआयडी चौकशी करावी, अशा मागणी त्यांनी केली.
जवखेडे येथील संजय जगन्नाथ जाधव, त्यांच्या पत्नी जयश्री व मुलगा सुनील अशा एकाच कुटुंबातील तिघांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आठवले यांनी बुधवारी या गावी जाऊन संजय यांच्या वृद्ध आई-वडिलांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर सायंकाळी नगर येथे ते पत्रकारांशी बोलत होते. या भेटीत आठवले यांनी पक्षाच्या वतीने २ लाख रुपये व खासदार दिलीप गांधी यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने एक लाख रुपयांची मदत या कुटुंबीयांना जाहीर केली.
पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले, जाधव कुटुंबीयांची हत्या हा क्रूरतेचा कळस आहे. या घटनेचे नेमके कारण अद्यापि समजले नाही. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. मात्र आरोपींना तातडीने अटक झाली पाहिजे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची भीती आता लोकांमध्ये राहिलेली नाही. पूर्वी या गुन्ह्य़ात जामीन मिळत नव्हता. आता तात्काळ जामीन होतो. यातील फोलपणा लक्षात घेऊन या कायद्याचा आढावा घेऊन त्यात आवश्यक ती दुरुस्ती केली पाहिजे. नगर जिल्हा म्हटले, की शिर्डीचे साईबाबा, शनिशिंगणापूरचे शनि ही धार्मिक ठिकाणे आणि सहकाराची पंढरी डोळ्यांसमोर येते. मात्र आता दलितांच्या अत्याचारांनी हा जिल्हा गाजतो आहे. या सततच्या घटनांची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
पीडित जाधव कुटुंबीयांना राज्य सरकारकडून दहा ते पंधरा लाख रुपयांची मदत मिळवून देण्याचा प्रयत्न आहे, असे आठवले यांनी सांगितले. या कुटुंबीयांना मारणा-या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करतानाच त्यासाठी आपण प्रभावी पाठपुरावा करणार आहोत, असे आठवले यांनी सांगितले. येत्या दि. २७ ला नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर या प्रकरणी मोर्चा काढणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. अशोक गायकवाड, श्रीकांत भालेराव, अजय साळवे आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.